श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती विमनस्क अवस्थेतच स्मशानात पोहोचली. तिचा एकंदर अवतार पाहून ही आजही काहीतरी भलतंच करणार असा कयास तिथं उपस्थित असलेल्या एकाने लावला आणि त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. ती जळून राखरांगोळी झालेल्या चितेजवळ जाऊन दोन्ही पायांवर बसली आणि तिने त्या राखेत हात घातला. यातील चिमुटभर राख ती कपाळावर लावेल असं वाटत असतानाच का कुणास ठाऊक तिने अत्यंत आवेगाने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती राख घेतली…आधी तोंडाला फासली आणि मग आपल्या डोक्यात घातली….बघणारे सर्व स्तब्ध आणि नि:शब्द! काय बोलणार?
“मी यानंतर कोणालाही असं बेवारस जळू देणार नाही!” असं काहीसं ती पुटपुटत राहिली बराचवेळ आणि तिथून निघून गेली झपाझप पावलं टाकीत.
कालच दुपारी ती आली होती आपल्या सख़्ख्या भावाचं शव घेऊन इथं. सोबत मोजकीच माणसं. आणि त्यात कुणीही पुरूष नाही. तिच्या भावाला आदल्या संध्याकाळी काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं भररस्त्यात. तिने खूप आरडाओरडा केला पण कुणीही तिच्या मदतीला धाऊन आलं नाही. तिने स्वत: कशीबशी रुग्णवाहिका बोलावून घेऊन रक्तबंबाळ झालेल्या भावाला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. खरं तर तो जागीच गतप्राण झालेला होता. त्याचा देह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात हलवला पोलिसांनी..ती ही तिथपर्यंत गेली पाय ओढत ओढत आणि तिथलं भयावह वास्तव पाहून ती मनातून पार हादरून गेली. अगणित शवं पांढ-या कापडांनी गुंडाळून ठेवलेली…नातेवाईकांची वाट पहात.
उत्तरीय तपासणी होण्यास काही वेळ तर लागणारच होता….भावाचं शव ताब्यात घेण्याची तिची हिंमत होईना…एकटीच होती ती त्याची नातेवाईक म्हणून. आईचं काहीच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं होतं. वडील कामावर गेलेले होते. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेत ते हंगामी चालक म्हणून कामावर होते. ती इस्पितळातून थेट घरी पोहोचली. आणि अगदी विमनस्क अवस्थेत बसून राहिली. वडील घरी आले…त्यांना ही बातमी समजली होती उडत उडत. पण नेमकं काय झालं हे त्यांना तिच्या तोंडूनच कसे बसे समजले आणि ते धाडकन खाली कोसळले आणि थेट कोमा मध्ये गेले…बेशुद्ध!
खुनासारखं भयानक प्रकरण ऐकून जवळचा कुणीही नातेवाईक यांच्या घरी फिरकायला तयार नव्हता. आपण भावाला असं एकटं बेवारस टाकून तिथून निघून यायला नको होतं…तिला वाटलं. तो पर्यंत रात्र सरून गेली होती. ती तशीच इस्पितळात पोहोचली. काहूर माजलेल्या काळजानं तिने सोपस्कार उरकले आणि भावाला स्मशनात आणलं. पण अंत्यविधी पार कोण पाडणार. घरचा एकही पुरूष तिथं आलेला नव्हता. महिला तर करूच शकत नाहीत अंत्यविधी. मग तिने आपल्या डोक्यावर एक मोठं फडकं बांधलं…पगडी सारखं. आणि स्वत: पुढे होऊन जे काही करायचं असतं ते केलं भरल्या डोळ्यांनी. “दादा, तुला काल तिथं असं एकट्याला टाकून यायला नको होतं रे मी!” ती त्याचा देह विद्युतदाहिनीच्या मुखात दिसेनासा होईपर्यंत म्हणत होती. तिथं रडायला ती एकटीच होती. स्मशान भूमीत आणखी बरेच देह प्रतिक्षेत होते अंतिम निरोपाच्या. पण त्यापैकी अनेकांच्या देहासमवेत फक्त एखादा पोलिसच होता. अन्य कुणीही नाही. मग तिला समजलं….अशा हजारो बेवारस मृतदेहांची पोलिसांना विल्हेवाट लावावी लागते. २०१८ ते २०२२ या चार वर्षांतली आकडेवारी होती…अकरा हजार बेवारस देह. पैकी केवळ दीड हजारांच्या नातेवाईकांची तपास लागला आणि त्यांना शेवटचा निरोप मिळाला. बाकीचे असेच सरकारी यंत्रणांनी थंडपणे आणि यांत्रिकपणे इथपर्यंत पोहोचवले आणि इथल्यांनी एखादी चीजवस्तू जाळून टाकावी तसे ते देह अग्निच्या हवाली केले होते!
ती सकाळी एका निश्चयानेच स्मशानभूमीत पोहोचली होती. तिने भावाची राख आपल्या डोक्यात घालून प्रण केला…मी करीन बेवारसांवर अंतिम संस्कार!
वर्ष २०१८…खरं तर तिचं लग्न ठरलं होतं. एका फौजीसोबत तिचं रीतसर लग्न लागणार होतं. ती उच्चशिक्षित समाजसेवा विषयात पदव्युत्तर पदवी. कायद्याचा अभ्यास सुरु होता. एका इस्पितळात एडसग्रस्तांसाठी समुपदेशक म्हणून सेवाही करीत होती. चारचौघींसाराखीच तिचीही स्वप्नं होती. आईने लग्नासाठी दागिने खरेदी करूनही ठेवले होते. पण ती आईच देवाघरी गेली आणि पुढच्याच वर्षी माणसा-माणसांतली करूणा रसातळाला नेणारा कोरोना उपटला. लग्न लांबणीवर पडलं. तिचा भाऊ एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी करत असे. त्याचे कुणाशी काही वाद झाले आणि त्यात त्याचा खून पडला.
हिच्या घरात आता आजारी वडील, त्यांची वृद्धा आई एवढीच माणसं शिल्लक राहिली होती. भावाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तिने त्याला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला आहे आजवर. गेल्या दोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे चार हजारांना प्रेतांवर तिने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात विविध जातीधर्मांच्या माणसांच्या प्रेतांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या महानगरामध्ये आसपासच्या राज्यांतून हजारो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात घरंदारं सोडून. यातल्या अनेकांच्या नशिबी अशी एकाकी मरणं येतात. देहांवर ओळखपत्रं सापडत नाहीत. फौजदारी कायद्यामधील तरतुदींनुसार विशिष्ट काळ वाट पाहून या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते.
आपली कथानायिका पुजा शर्मा गेल्या दोन वर्षांपासून दरदिवशी सरासरी तीन-चार मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हरिद्वार गंगा किनारी जाऊन या बेवारस लोकांची रक्षा विधिवत विसर्जित करते पापक्षालिनी गंगेच्या वाहत्या प्रवाहात…..हे पुण्यकर्मच नाही तर काय?
नातेवाईक आता पुजा पासून अंतर ठेवून आहेत. तिच्या या कामामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमी झाली आहे. तिच्या घरीही कुणी फारसं येत नाही. हो, पोलिस आणि सरकारी यंत्रणांना मात्र पुजा आता एक हक्काची माणूस झाली आहे. फाटलेल्या आभाळाला हे पुजा नावाचं थिगळ पुरणार नसलं तरी काही भाग झाकणारं तर निश्चितच आहे. पुजाचे वडील तिला त्यांच्या वेतनातून काही रक्कम देत असतात, तर आजी तिच्या निवृत्तीवेतनाचा काही भाग देते. आजीच्या मालकीचा असलेला जमिनीचा एक छोटा तुकडा तिने पुजाला दिला आहे…त्या जागी आता काही बेवारस वृद्धांना,बालकांना आधार मिळतो. पुजाने पुढे जाऊन Bright the Soul Foundation नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे.
डोक्यात राख घालून काहीतरी विध्वंसक करण्याऐवजी पुजाने एक अत्यंत वेगळा मार्ग अनुसरला आहे…आणि म्हणूनच तिचं कौतुक वाटतं. पुजा शर्माच्या या कार्याला समाजाने पाठबळ दिलं तर बरंच होईल!
सोळा संस्कारांपैकी हा सोळावा संस्कार न लाभणं यापरती दुर्दैवाची गोष्ट नसावी. सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला..तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी…असं कविवर्य सुरेशजी भट म्हणून गेलेत…खरा तर हा सर्व जीवांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारी अनेक माणसं,संस्था आपल्या आसपास असतील…सांगलीतल्या अशाच एका मित्रमंडळाविषयी वाचल्याचं स्मरतं. या सर्व जिवंत मनाच्या माणसांना मानाचा मुजरा!
एका गावात बैल विकणारा एक माणूस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर दूर कुठल्याशा मुलखातून येत असे. त्याच्याकडच्या मोठ्या शिंगांच्या बैलांना स्थानिक भाषेत लोक हेडी बैलं म्हणून ओळखायचे…आणि म्हणून त्या विक्रेत्याला हेड्याबाबा असं नाव पडून गेलं होतं. मशगतीच्या कामाचा मौसम असल्यानं शेतकरी त्याच्याकडचे मोठाल्या शिंगांचे,ताकदवान बैल विकत घेतही असत. एकेवर्षी विकायला आणलेल्या बैलांना पाणी पाजायला म्हणून हा हेड्याबाबा नदीवर गेला आणि नदीतल्या त्याला अनोळखी डोहातल्या चिखलात रुतून बुडाला! दोन दिवसांनी त्याचं प्रेत पाण्यावरती आलं. त्याच्या देहाला हात कोण लावणार? ना ओळखीचा ना पाळखीचा…न जाणो कोणत्या जातीचा? जुना काळ तो. पोलिस पंचनामा असे फारसे सोपस्कार नव्हते त्या काळी. लोक नुसते काठावर उभे राहून दर्शक बनले होते. त्याच गावकुसाबाहेर राहणारा एक मोठ्या काळजाचा माणूस त्या चिखलात उतरला आणि त्याने ते प्रेत काठावर आणले. जनावरांची प्रेतं हाताळणं वेगळं…पण माणसाचा मृतदेह? सोपं काम नसतं हे! त्याने ते प्रेत दोन्ही हातांवर घेतलं आणि थेट त्याच्या मालकीच्या शेतावर नेलं. रीतसर सरण रचलं…आणि त्या अनोळखी,बेवारस देहाला अग्निच्या स्वाधीन केलं…सकाळी राख सावडली आणि ज्या नदीत त्याला मरण आलं होतं त्याच नदीत ती राख प्रवाहीत केली! लोक म्हणतात…हेड्याबाबा त्याच्या शेताची आजही राखण करतो…त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून! असो.
पूजा शर्माची प्रेरणादायी कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपल्या माहितीसाठी लिहिली. पूजा शर्मा यांच्या सामाजिक संस्थेविषयी अधिक माहिती इंटरनेट वर मिळू शकते. ([email protected] या ईमेलवर संपर्क करता येईल.) विषय अप्रिय असला तरी अपरिहार्य आहे.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈