सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा मूर्तिमंत अवतार असलेले क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर)
भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन भावंडांनी आपली शिर कमले भारतमातेच्या चरणी अर्पण केली. जुलमी इंग्रज अधिकारी रँडचा वध करणारे मोठे बंधू दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.
हरिकीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेले दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघे बंधू . बालपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती .त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता. तिघेही बंधू हरिकीर्तनात वडिलांना मदत करीत असत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन लोकांमध्ये क्रांतीसाठी स्फूर्ती घडवीत. मुलांना कवायत शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असत.
१८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्यात प्रचंड अत्याचाराचा हैदोस मांडला होता. पुण्याचा कलेक्टर रँड हा अत्यंत क्रूर होता. पुण्यातील नागरिकांवर प्रचंड अत्याचार करू लागला. अत्याचारी रँड विषयी चापेकर बंधूंच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दामोदरपंतांनी रँडच्या वधाची योजना आखली.
२२ जून १८९७ या दिवशी पुण्यातील गणेश खिंडीत एका कार्यक्रमाहून परतत असताना उन्मत रँड आणि आयस्टर या दोघांना गोळ्या झाडून वध केला. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदर पंतांना पकडले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात आजच्या दिवशी फाशी देण्यात आले. तीनही बंधू अत्यंत धैर्याने फासावर चढले. या सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास अजरामर आणि प्रेरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यावर जहाल असा पोवाडा रचला.
स्वार्थ मारुनी लाथ; ठोकिला रँड जनछळ शमनाला l
परार्थसाधू श्री चाफेकर योग्य का न ते नमनाला ll
पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिती जरि घुबडे l
वीर कथा तुमची ही गाईल पिढीपिढी नव पुढे पुढे ll
दामोदर चाफेकर फासावर गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले वर्णन..
न्यायाधीश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी l
सत्य देशहित वऱ्हाड जमले कीर्ती नीति ह्या वऱ्हाडणि l
टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले l
स्मरले गीतमंत्र दामूने मुक्ती- नवरीला हो वरिले l
परी अहाहा! मायावी ही नवरी वर पळवील कुठे l
कुठे हरपले वऱ्हाड सारे अंगाला बहु कंप सुटे !
भारतमातेला सुद्धा या शूर अशा तीन बंधूंचा अभिमान वाटला असावा. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.
क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या पराक्रमाला वंदन.
लेखक : संतोष भोसेकर
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈