सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ ‘स्पर्श’… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं..
जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो.
त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.
नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. “कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू” असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते..
जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं. कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!”
स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.
जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये काम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले.
स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी! एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते.
जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा.
बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, “Nothing is so healing as the human touch.”
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈