सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ उडी शेवटची… — लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
व्हेल हा मत्स्य योनीतला राजस मासा, व समुद्रातील सर्वोच्च भक्षक! (Apex Predator). असं म्हणतात की व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. पूर्ण वाढलेला व्हेल जवळजवळ 200 टन वजनाचा आणि शंभर फूट लांब इतका असतो. Toothed व Baleen असे व्हेल चे दोन प्रकार. डॉल्फिन, पॉर्पोईज या व्हेलच्याच उपजाती. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी समुद्रात व्हेल्सचा वास असतो. त्यांची आवाज काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. समुद्राखालून सोनार लावल्यास व्हेलचे आवाज ऐकू येतात. व्हेल्सच्या या आवाजांचा वापर करून युद्धामध्ये गुप्तहेर पाणबुड्या टेहळणीसाठी वापरतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व कोणाला समजू नये.
व्हेल बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु आज मी व्हेलच्या शेवटच्या उडी बद्दल लिहिणार आहे. दर्यावर्दी लोकांची अशी एक म्हण आहे – “When a whale falls, everything grows” हे कसे काय? तेच सांगणार आहे. असा विश्वास आहे की, व्हेल माशात एक अजब क्षमता असते. मरण जवळ आल्याची पूर्व सूचना! जेव्हा ही वर्दी येते तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कोठेतरी शांत व एकांत स्थळ निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर कवायती करणार असतो. त्याचे हे शेवटचे व उत्तम सादरीकरण असणार असते. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो अगदी शांतपणे, लयबद्ध व आनंदात ! शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन तो त्याची शेवटची उडी मारतो, डोळे बंद करतो, श्वासही बंद करतो व समुद्रतळाकडे हळूहळू जाऊ लागतो. होय… आता मरणास तो आनंद, संयम व निर्भीडपणे सामोरा जातो. हीच ती व्हेल ची शेवटची उडी.
व्हेल ची ही शेवटची उडी अनेक नवनिर्मितीला आमंत्रण देत असते. शार्क व ईल माशांना याचा पहिला सुगावा लागतो. ते तुटून का पडत नाहीत? कारण एवढा प्रचंड महाकाय मासा त्यांना अनेक दिवस खाद्य म्हणून पुरणार असतो. जेव्हा व्हेलचे शरीर समुद्रतळावर येऊन स्थिर होते तेव्हा समुद्रतळातले छोटे छोटे मासे (Crustaceans) त्यातील प्रोटीन्स व ऑरगॅनिक पदार्थ खाऊ लागतात. ते त्या शरीरात वस्ती करूनच राहतात. जवळजवळ दोन वर्ष ही प्रक्रिया चालते. व्हेलच्या शरीरातील सर्व काही खाऊन फस्त झाल्यावर जो उरतो तो फक्त त्याचा सांगाडा! त्यांचे प्रजनन तर चालूच असतं. आता यापुढे काम असतं एका बॅक्टेरियाचं. (Anaerobic Bacteria). सांगाडा पोखरून त्यातील लिपिडचे विच्छेदन करून त्यापासून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण केला जातो. ही प्रक्रिया येथेच थांबत नाही तर यातूनही व्हेलचे जे पार्थिव असते त्याचे रूपांतर रिफ (प्रवाळ) मध्ये होते. हेच ते समुद्र जलचरांचे छोटे छोटे निवास. शंभर वर्ष ही प्रक्रिया चालते व एका व्हेल माशाचा शेवटचा अणु रेणू ही वापरला जातो. व अशा प्रकारे एका व्हेलच्या शरीरातून ४३ प्रजाती व जवळपास १२,४९० जीव जीवाणूंना रोजगार व जीविताचा आधार होतो पुढील जवळ पास शंभर वर्षे … एक व्हेल समुद्र तळाशी जातो, जेणेकरून एवढे सगळे जीव जीवाणू त्यावर जगू शकतील …
लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈