श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ “राहून गेलेलं स्मारक” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेल्यानंतर तिचे स्मारक होते. अगदी स्मारक झाले नाही तरी त्याविषयी चर्चा तर होतातच.ते व्हावे की नाही.. व्हावे तर कुठे व्हावे.. कसे व्हावे यावर बरेच वादविवाद होतात.अलिकडे तर ‘स्मारक’ हा विषयच टिकेचा,कुचेष्टेचा झालेला आहे.
नाशिकला मात्र तात्यासाहेब शिरवाडकरांचे घर हेच स्मारक म्हणुन जपुन ठेवलेले आहे. तात्यांची ती खोली.. बसण्याची खुर्ची.. लेखनाचे टेबल..त्यावर असलेल्या तसबिरी.. चार्ली चैप्लीन आणि गडकर्यांच्या. तेथे गेल्यानंतर क्षणभर भास होतो..आत्ता तात्या आतल्या खोलीतुन बाहेर येतील..श्रीराम श्रीराम म्हणत.
असंच अजुन एक स्मारक माझ्या बघण्यात आलं होतं.गणपती पुळ्याजवळच्या मालगुंड गावी. कवी केशवसुतांचं.त्यांचंही रहातं घर असंच जपुन ठेवलंय. दाट माडांच्या बनातलं ते कौलारू घर.लाल चिर्यांपासुन बनवलेलं.बाहेर पडवीत असलेला झोपाळा.. आतील माजघर..स्वयंपाकघर.. त्यातीलच ती शंभर वर्षापुर्वीची भांडी. कुसुमाग्रज तर म्हणालेही होते एकदा.. हे केवळ घर नाही तर ही मराठी काव्याची राजधानी आहे.
ग.दि.माडगूळकरांचं पण एक असंच स्मारक होणार होतं.माडगुळ या त्यांच्या गावी.तेथे त्यांचं घर होतं.आणि एक मळा. मळ्यात होती एक छोटीशी झोपडी. तीन बाजुंनी भिंती. दार वगैरे काही नाही. गावातील इतर घरे धाब्याची.फक्त या झोपडीवर लोखंडी पत्रे. म्हणून याचे नाव.. बामणाचा पत्रा.
गदिमा.. म्हणजे अण्णा तसे रहात पुण्यात. पण कधी शहरातील धकाधकीच्या आयुष्याचा त्यांना कंटाळा येई.कागदावर नवीन काही उतरणं मुष्किल होई.अश्यावेळी त्यांना साद घाली तो हाच ..बामणाचा पत्रा.
इतर वेळी याचा वापर गोठ्यासारखाच.पण अण्णा आले की त्याचे रुपडे बदलुन जाई.सारवलेल्या जमीनीवर पांढरीशुभ्र गादी..लोड..तक्के.त्या कच्च्या भिंतीवर असलेल्या खुंटीवर अण्णांचे कडक इस्त्रीचे जाकीट.. सदरे..खाली बैठकीवर निरनिराळे संदर्भ ग्रंथांचे ढीग.हे अण्णांचे स्फुर्तीस्थान होते.
पुर्वाभिमुख असलेल्या या झोपडीत अण्णा मग मुक्काम ठोकत.इथली सकाळ त्यांना मोहवुन टाके.ते म्हणतात..
“गावात चाललेल्या जात्यावरीर ओव्या झोपलेल्या कवित्व शक्तीला जागे करतात. पहाटे वार्यावर येणारा पिकांचा वास हिरव्या चाफ्याच्या वासासारखा उत्तेजक वाटतो.सारे वातावरणाच असे की पुन्हा झोप नको वाटते. अशा वेळी मी एकटाच उठुन उभ्या पिकांमधुन हिंडुन येतो. दवात भिजलेली जोंधळ्यांची पाने पायाला लाडीक स्पर्श करतात. ओला हरभरा गमतीदार चावे काढतो,तर करडईची काटेरी झाडे पायावर पांढर्या आणि बोचर्या रेघोट्या मारतात.”
हिंडुन आलं की सुस्नात होऊन लेखनाच्या बैठकीवर ते येत.या मातीचाच गुण..झरझर शब्द कागदावर उतरत जात.मधुन घरचा डबा येई.बाजरीची भाकरी, लसणीची खमंग चटणी, आणि सायीचे दही. कधी जेवणासाठी घरी चक्कर असे. अण्णा म्हणतात..
“आपल्या स्वतःच्या रानात पिकलेल्या शाळुची पांढरीशुभ्र भाकरी.. उसातल्या पालेभाज्या.. घरच्या गाई म्हशींचं दुधदुभतं..माणदेशात पिकणाऱ्या गुलाबी तांदळाचा चवदार भात..आणि वाढणारी प्रत्यक्ष आई.
जगातल्या कुठल्याही पक्वानाने होणार नाही एवढी त्रुप्ती त्या जेवणाने होते. मग पाटाच्या कडेला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या गार सावलीचे मला बोलावणे येते. उजव्या हाताची उशी करुन मी मातीतच आडवा होतो. त्या भूमीतील ढेकळे मला रुतत नाही, खडे टोचत नाही. झोप अगदी गाढ लागते.”
तर असा हा ‘बामणाचा पत्रा’.अनेक अजरामर कवितांचा, कथा, पटकथांचा जन्म इथेच झाला.तो गाव..बामणाचा पत्रा,आणि गदिमा..हे अगदी एकरुप झाले होते. गदिमा गेले त्या वर्षी गावातली खंडोबाची यात्रा भरली नाही की कुस्त्यांचा फड भरला नाही.
गदिमा गेल्यानंतर व्यंकटेश माडगूळकर प्रथमच गावी आले होते.गदिमांचे वर्गमित्र आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब देशमुख यांनी गावकर्यांची इच्छा बोलुन दाखवली. ते म्हणाले…
तुम्ही तिकडे मुंबई, पुण्यात आण्णांचे काय स्मारक करायचे ते करा.पण आमची एक इच्छा आहे.या गावी.. या वावरात अण्णांचं एक स्मारक हवं.
व्यंकटेश माडगूळकरांना पण पटलं ते.त्या रात्री ते ‘बामणाच्या पत्र्या’तच झोपले.सकाळी उठले. समोर पूर्व दिशा उजळत होती. आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या अण्णांचे स्मारक आकार घेत होतं.
ही सभोवार हिरवी शेते..हवेत भरुन राहिलेला ओल्या जमीनीचा, उभ्या पिकांचा गंध..मधे हा ‘बामणाचा पत्रा’..हाच तो दगड,ज्यावर बसुन अण्णा आंघोळ करत..बापु रामोशी भल्या पहाटेच तात्पुरत्या चुलवणावर मोठा हंडाभर पाणी तापवुन ठेवी.आंघोळ करतानाचे त्यांचे ते शब्द कानात घुमताहेत..
‘हर गंगे भागीरथी’.
विहीरीचं पाणी त्यांच्या डोक्यावर पडलं की खरंच त्याची गंगा भागीरथी होऊन जाई.
त्यांना वाटलं..
शिल्पकार भाऊ साठ्यांना बोलावुन घ्यावं.या आंघोळीच्या दगडाच्या जागी एखादं शिल्प त्यांच्या कल्पनेतुन घडवावं.वास्तुशिल्पी माधव आचवल यांनाही बोलवावं.त्यांच्या कल्पनेतुन इथे बरंच काही करावं.आजुबाजुला कायम फुललेली बकुळ, पलाशची झाडे लावावी. त्याखाली बाके.इथेच ती अण्णांची आरामखुर्ची ठेवावी. जानेवारीच्या थंडीत अण्णा इथे येत.त्यावेळी त्यांच्या अंगावर असणारा तो कोट..इथेच खुंटीवर टांगलेला असावा. त्यांची ती लोखंडी कॉट..ती पण इथेच कोपर्यात राहील. अण्णांची पुस्तके, हस्तलिखितं..सगळं इथं आणु.
हे गाव..इथली झाडंझुडं..पाखरं..पिकं..माणसं..हे सगळं मिळुनच इथे एका लेखकाचं स्मारक बनवु या.
व्यंकटेश माडगूळकरांच्या कल्पनेतलं हे स्मारक व्हायला हवं होतं..पण नाही झालं..त्याचं दुःख आहेच.पण अखेर स्मारक म्हणजे काय?कशासाठी असतं ते?
तर ती व्यक्ती कायम स्मरणात रहावी यासाठीच ना!
आणि गदिमांचा उर्फ अण्णांचा विसर कधी पडेल हे संभवतच नाही. चैत्राची चाहुल लागली की ‘राम जन्मला गं सखे..’ हे आठवणारच आहे. आणि आभाळात ढग दाटून आले की ‘नाच रे मोरा..’ ओठांवर येणारच आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या स्मारकाची जरुरच काय?
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈