श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान
मध्यप्रदेशातील रतलाम नावाचं त्याचं जन्मगाव समुदसपाटीपासून सुमारे ४८० मीटर्स उंचीवर आणि कोणत्याही समुद्रकिना-यापासून शेकडो किलोमीटर्स दूर! पण छोट्या धर्मेंद्रला लहानपणापासूनच समुद्राचं आकर्षण होतं आणि त्यापेक्षा जास्त समुद्रात लाटांवर स्वार होत क्षितीजापर्यंत आणि क्षितीजाच्याही पल्याड जाण्या-या नौकांचं. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात सोडल्या जाणा-या कागदी होड्या त्याला फारशा भावायच्या नाहीत. उलट इतिहासाच्या पुस्तकातल्या जुन्या लढाऊ जहाजांची मोहिनी त्याला पडली होती. जहाजं एवढी मोठी असतात आणि तरीही ती पाण्यावर सहजपणे तरंगत जातात तरी कशी असा प्रश्न त्याच्या बालमनाला सहज पडत असे.
हे आणि असेच काही प्रश्न मनात घेऊन हा मुलगा इंजिनीअर झाला. अर्थातच उत्तम नोकरी शोधावी आणि गृहस्थाश्रमात पडावं असं त्याला आणि त्याच्या पालकांना वाटणं साहजिकच होतं. पण धर्मेंद्र सिंग यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली होती ती सेनादलात जाण्यासाठीच. भारतीय नौदलात नौसैनिक अधिका-यांची भरती निघताच धर्मेंद्रसिंग यांनी आपली सारी बुद्धीमत्ता, शारीरिक क्षमता पणाला लावून भारतीय नौसेनेचा चमकदार सफेद गणवेश अंगावर चढवलाच. त्यांच्या डोक्यावरची नौसेनेची विशिष्ट कॅप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या तजेलदारपणाला आणखीनच उजाळा देणारी दिसे. वर्ष होतं २०१३.
गावातल्या नदीत, तळ्यात पोहणं, नौकाविहार करणं वेगळं आणि थेट लढाऊ जहाजांवर देशसेवा करायला मिळणं वेगळं. धर्मेंद्र्सिंग आणि समुद्राचं नातं फार लवकर जुळलं आणि अर्थातच लढाऊ जहाज हे त्यांचं दुसरं निवासस्थान बनलं.
त्यांना लाभलेलं पाण्यातलं निवासस्थान काही साधंसुधं नव्हतं. तब्बल बावीस मजली इमारतीएवढी उंची होती या घराची आणि वजन होतं ४४, ५०० टन. लांबी म्हणजे फुटबॉलच्या तीन मैदानं बसतील इतकी आणि रुंदी म्हणाल तर कित्येक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स सहज मावतील एवढी. आणि नाव होतं आय. एन. एस. विक्रमादित्य! भारताची सर्वांत शक्तिशाली, आधुनिक युद्धनौका. रशियाकडून खरेदी केली गेलेली ही युद्ध नौका सरतेशेवटी अतिशय सुसज्ज होऊन २०१४ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश करती झाली आणि तिने शत्रूच्या काळजात धडकी भरवली.
युद्धनौकेवर अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. विक्रमादित्य वर जवळ जवळ सव्वाशे अधिकारी आणि पंधराशे नौसैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सदैव सज्ज असतात. धर्मेंद्र सिंग साहेबांनी एका नौसैनिकाला अत्यावश्यक असलेली सर्व कौशल्ये अल्पावधीत शिकून घेतली. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्यात तर त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला होता. अग्निप्रतिबंध या विषयात तर त्यांना खूप गती होती.
आय. एन. एस. अर्थात इंडियन नेवल शिप ‘विक्रमादित्य एप्रिल २०१९ मध्ये मित्रराष्ट्रांच्या सोबत मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार होतं. यासाठी खूप मोठी तयारीही केली जात होती.
महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या करुणा यांचं स्थळ धर्मेंद्र सिंग साहेबांना सांगून आलं होतं. वयाची तिशी आली होती आणि विवाह योग जुळून आला होता. नौसैनिकांना खूप मोठ्या कालावधीसाठी जहाजांवर वास्तव्य करावं लागतं. युद्धनौका म्हणजे एक तरंगतं शहरच जणू. इथं राहण्यासाठी खूप मजबूत मन:शक्ती आणि संयम आवश्यक असतो.
आपलं आवडतं जहाज सरावात सहभागी असणार आणि आपण त्यावर नसू याविचाराने धर्मेंद्र सिंग साहेबांनी आपल्या विवाहानंतर काही तासांतच समुद्राची वाट धरली. विवाहात अग्निला साक्षीला ठेवून त्यांनी सात प्रदक्षिणा घालतानाही त्यांच्या मनात आपलं कर्तव्य असावं. आणि योगायोगानं विक्रमादित्यवरही त्यांना अशीच एक जीवघेणी अग्नि-प्रदक्षिणा घालावी लागेल, असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.
विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करण्याच्या अगदी बेतात असताना नौकेच्या इंजिनरूम मध्ये आग भडकल्याचं समजलं. नौकेवरची अग्निशमन यंत्रणा सज्ज होतीच आणि नौसैनिक सुद्धा. लेफ्टनंट कमांडर पदावर पोहोचलेले धर्मेंद्रसिंग चौहान साहेब या अग्निशमन मोहिमेचे धडाडीने नेतृत्व करीत होते. या कामात त्यांना उत्तम गती होती. भारताची एवढी मोठी दौलत, सोळाशेच्या वर नौसैनिकांचे भवितव्य पाण्यात लागलेल्या त्या अग्नितांडवात रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.
धर्मेंद्रसिंग साहेब मोठ्या त्वेषाने धुराने भरलेल्या कक्षामध्ये शिरले. त्यांचा आवेश पाहून इतर नौसैनिकांनाही स्फुरण चढले. आगीवर नियंत्रण मिळण्याची चिन्हे अगदी दृष्टीपथात होती. इतक्यात एक वाफेचा पाईप अचानक फुटला आणि त्यातील अतिशय उष्ण वाफ धर्मेंद्रसिंग साहेबांच्या अंगावर आली आणि ते होरपळून निघाले. नाका-तोंडात आधीच विषारी धूर गेला होताच. समोरचं काही दिसत नव्हतं. पण साहेब मागे हटले नाहीत….. शुद्ध हरपेपर्यंत ते आगीशी सामना करीत राहिले. युद्ध काही मैदानातच लढली जातात असं नव्हे. देशाची संपत्ती जतन करण्यासाठी केलेला संघर्षही युद्धापेक्षा कमी नसतो.
लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान साहेबांनी विक्रमादित्य आणि त्यावरील सोळाशे सैनिकांचं त्यादिवशी मृत्यूपासून संरक्षण केलं होतं स्वत: अग्निसाक्षी राहून. परिस्थिती नियंत्रणात येताच साहेबांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करून पोहोचवण्यात आलं…. पण अग्निनं डाव साधला होता! चाळीसेक दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेला तीस वर्षे वयाचा एक उमदा नौसेना अधिकारी आता मृत्यूच्या वेदीवर पहुडला होता. नववधूच्या हातांवरील मेहंदी अजून फिकी पडलेली नव्हती…. मात्र तिच्या सुखी संसाराची नौका मृत्यू नावाच्या खडकावर आदळून अगदी गर्तेत गेली होती… कायमची. आईच्या हृदयचा तर विचार करूनही थरकाप उडावा. मोठ्या सन्मानानं शहीद धर्मेंद्रसिंग साहेबांना रतलामवासियांना अंतिम निरोप दिला. पण भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्तपणाची कमाल पहा… काहीच दिवसांत धर्मेंद्र्सिंग साहेबांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची पात्रता पार केली. नौसेनेचा सफेद गणवेश अंगावर परिधान करून प्राणांची बाजी लावलेल्या आपल्या पतील पायदळाचा ऑलिव्ह ग्रीन गणवेश मिळवून श्रीमती करूणा सिंग एक अनोखी भेट देण्यास सज्ज झाल्या. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. आणि त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या! सलाम करूणा सिंग मॅडमच्या जिद्दीला. उण्यापु-या पंधरवड्याचा त्यांचा आणि धर्मेंद्रसिंग साहेबांचा सहवास…. पेशाने प्राध्यापिका असलेल्या एका नाजूक तरूणीस थेट सैनिकाचं काळीज देऊन गेला. शहीद सैनिक असेच आपल्या आठवणींतून, कर्तृत्वातून जगाच्या स्मरणपटावर आपली पावलं ठळक उमटवून जातात. यांच्या ऋणातून उतराई होणं कठीण पण त्यांचे स्मरण करणं सहजी शक्य. जयहिंद! जय हिंद की सेना.
शहीद लेफ़्टनंट कमांडर धर्मेंद्र्सिंग चौहान साहेबांना शतश: नमन.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈