श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ श्री क्षेत्र पद्मालय ☆ श्री सुहास सोहोनी ☆
(एकाच मंदिरात दोन गणपती असणारं, भारतातील एकमेव “श्री क्षेत्र पद्मालय”:)
देवदेवतांचा पौराणिक वारसा लाभलेले आणि ३१३७ ईसापूर्व महाभारत काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले, खान्देशातील श्री क्षेत्र पद्मालय, म्हणजे संपूर्ण भारतातील श्री गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री. क्षेत्र पद्मालय हे डोंगर माथ्यावर वसलेले आहे. एरंडोलहून पद्मालयला जातांना एक छोटा घाटच चढावा लागतो. श्री क्षेत्र पद्मालय, हे श्री गणेशांच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाभारतातील भीम-बकासूराचे द्वंद्व, पद्मालय येथेच झाल्याचे सांगतात.
जगात कोणत्याही गणपती मंदिरात गेल्यास, गणपतीची एकच मूर्ती पाहावयास मिळते. मात्र, श्री क्षेत्र पद्मालय येथे, एकाच छत्राखाली, एकाच सिंहासनावर, गणरायाच्या दोन मुर्त्या दृष्टीस पडतात, त्यात एक मूर्ती उजव्या सोंडेची व दुसरी मूर्ती डाव्या सोंडेची आहे. दोन्ही स्वयंभू प्रवाळ गणेश आहेत. ते कसे प्रकट झाले याचे वर्णन श्रीगणेश पुराणातील उपासना खंडातील ७३, ७४, ९० व ९१, या अध्यायांत मिळतो. रिध्दिसिध्दी प्राप्त करुन देणारे हे भारतातील, एकमेव श्री गणेशाचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
महाभारतात पांडवांवर, जेव्हा अज्ञातवासात राहण्याचा प्रसंग आला, तेव्हा ते एकचक्रानगरीत राहिले होते. ती एकचक्रानगरी म्हणजेच आजचे एरंडोल. त्या काळी, एकचक्रानगरी भोवताली घनदाट जंगल होते. तेथे बकासूर नावाचा राक्षस रहायचा. त्याची भोजनाची व्यवस्था गावकरी करायचे. त्याला रोज गाडीभर अन्न आणि एकमाणूस खायला लागायचा. पांडव ज्या ब्राम्हणाकडे रहात, त्याची पाळी आल्यावर, त्याच्या ऐवजी भीम जंगलात अन्न घेवून गेला. व त्याने बकासूराचा वध केला. त्या नंतर त्याला तहान लागली. त्या जंगलात, त्याने आपल्या हाताच्या कोपराने जमिनीवर प्रहार केला. तेथे मोठ्ठा खड्डा पडला व त्यातून पाणी निघाले. भीमाने त्या पाण्याने आपली तहान भागवली. तेच भीमकुंड. जे आजही पद्मालयला बघायला मिळते. पूर्वी या कुंडात एका खाटेची दोरी बुडेल, इतके ते खोल होते, असं सांगतात. आता ते गाळाने भरुन गेले आहे. एरंडोलला, पांडवांचा वाडा अजूनही बघायला मिळतो. येथून धरणगावहून पद्मालयला जायला भुयार होते असे सांगितले जाते. धरणगांवी दत्त टेकडीवर या भुयाराचं मुख बघायला मिळते, ज्यातून घोड्यावर बसून प्रवास करता येत होता, असं जुनेजाणते सांगतात. हाच तो पद्मालय आणि धरणगावातला अदृष्य बंध. म्हणून आम्हा धरणगावकरांनाही ते वैभवच वाटते. पूर्वी धरणगाव हे एरंडोल तालुक्यातच होते. आता विभाजन झाल्याने धरणगाव स्वतंत्र तालुका झाला आहे.
पौराणिक कथेनुसार राजराजेश्वर सहस्त्रार्जुन याने केलेल्या जप-उपासनेवर प्रसन्न होवून, येथेच त्याला उजव्या सोंडेच्या स्वरूपाने “श्री” नी दर्शन दिले. तर, शेषनागाला शंकर भगवंतांनी टाकून दिले होते. तेव्हा, श्री शंकरांनी पुन्हा त्याला गळ्यात धारण करावे, यासाठी शेषाने “श्रींची” तपश्चर्या केली. त्याला डाव्या सोंडेच्या स्वरूपात श्रींनी तलावातून दर्शन दिले. अशी आख्यायिका पुराणात आहे. म्हणून या ठिकाणी एकाच मंदिरात श्रींची दोन मनभावन रुपं प्रवाळ स्वरुपात अनुभवता येतात.
मंदिरासमोर असलेल्या विस्तीर्ण तलावात सदैव कमळाची फुले फुलतात. यावरून या क्षेत्राला पद्मालय असे नाव पडले आहे. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे निवास. कमळाचे निवासस्थान म्हणजे पद्मालय. हे संपूर्ण क्षेत्र पूर्वीच्या काळी घनदाट आरण्य होते. वनौषधींनी नटलेले, निसर्ग संपदेने परिपूर्ण आणि जंगली प्राणी, श्वापदांनी समृध्द होते. ज्याच्या खाणाखुणा आजही अनुभवता येतात.
श्री क्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराची रचना ही हेमाडपंथी असून बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराची ती प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते. संत गोविंद महाराजांनी १८२५ मध्ये या देवालयाचा जिर्णोद्धार केला आहे. ते अजानबाहू, सिध्द पुरुष होते. त्यांना श्री गजाननांनीच स्मरणसाधनेत दर्शन देवून, आदेश दिल्याने ते येथे आले. या मंदिराचा शोध घेतला आणि जिर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी भडगाव येथील खाणीतील दगड वापरल्याचा उल्लेख जुन्या दस्तऐवजात मिळतो. देवालयात मूर्ती समोर मोठा सभामंडप असून, प्रवेश करताना साडेचार फुट उंचीचा दगडाचा एक मोठा उंदीर पाहण्यास मिळतो. देवालयासमोर मोठा दगडी घाट बांधला आहे.
या ठिकाणी एक मोठी पंचधातू मिश्रित अशी, सुमारे अकरा मणाची, ४४० किलोची घंटा बांधण्यात आली आहे. ही घंटा १८२६ मध्ये श्री क्षेत्र काशीविश्वेश्वर येथील, ठठेरी बाजारातील देवीदयाळ या कारागिराने बनवली आहे–जिचे त्या काळातील मुल्य ११००/-रु होते. जी वाजवली, तर तिचा आवाज एकचक्रानगरी म्हणजे, आजचे एरंडोल पर्यंत ऐकू येत असे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर अनलासुराचे शिर आहे. हा अनलासूर मुखातून अग्नीवर्षाव करत असे. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळविला होता. त्याचा उपद्रव वाढल्याने, त्याला बालगणेशाने गिळंकृत करुन संपविले. गिळंकृत केल्यावर, गणेशाच्या पोटात जो दाह झाला, तो शमविण्यासाठी श्री गणेशाला, २१ ऋषींनी २१ दूर्वा वाहिल्याची अख्यायिका आहे.
धरणगाव येथून (२२ किमी) जळगाववरुन (३० किमी) व एरंडोल येथून (११ किमी) वर असलेल्या पद्मालय येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू आहे.
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈