श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एकोणतीस प्राण…दोन रक्षक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
… कॅप्टन अमित भारद्वाज आणि हवालदार राजवीर सिंग !
“आई,नको हट्ट धरूस माझा चेहरा पाहण्याचा ! मला चेहरा असा उरलाच नाही गेल्या सत्तावन्न दिवसांत. कुडीतून प्राणांचं पाखरू उडून गेलं की पिंजराही चैतन्य गमावून बसतो. मातीतून जन्मलेला हा देह माती पुन्हा आपलासा करू लागते…अगदी पहिल्या क्षणापासून. आणि सत्तावन्न दिवस तसा मोठा कालावधी आहे ना! माती होत चाललेलं माझं शरीर तुझ्यातल्या मातेला पाहवणार नाही गं! तु माझा तो लहानपणीचा गोंडस, तुला मोहवणारा चेहरा आठव आणि तोच ध्यानात ठेव अखेर पर्यंत! ऐकशील माझं? आणि हो…माझ्या वस्तू,माझा युनिफॉर्म आणि आपला तिरंगा देतीलच की तुझ्या ताब्यात! त्या रूपात मी असेनच तुझ्या अवतीभोवती…सतत!
तु,पपा,दीदी….मला पाहू शकत नव्हतात….पण मी मात्र तुमच्या अवतीभवतीच घोटाळत होतो…इतके दिवस! आता तुमच्या सर्वांच्या देखत माझा देह अग्नित पवित्र होईल…तेंव्हा निघून जाईन मी माझ्या मार्गानं….स्वर्गात!
दीदीला मात्र मानलं पाहिजे हं…खरी शूर पोरगी आहे. तिला सर्व माहित होतं, पण तुम्हांला त्रास होऊ नये म्हणून ती तुम्हांला खोटा धीर देत राहिली… दादा, आहे… येईल… असं सांगत. तुम्ही दोघंही मग सांत्वनासाठी येणा-यांना छातीठोकपणे सांगत राहिलात….लढाई सुरू आहे…अमित जिंकून येईल! मी जिंकूनच आलो आहे… ममी… पपा!
१९९७ मध्ये ४,जाट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून सीमेवर कर्तव्यावर रुजू झालो तेंव्हा सर्व वरीष्ठांना ‘सर !’ म्हणून सल्यूट बजवावा लागायचा. आणि त्याची सवयही झाली होती दीड वर्षांत. १९९९…आता मी कॅप्टन झालो होतो.
एके दिवशी तो आला आणि मला “ लेफ्ट्नंट सौरभ कालिया,रिपोर्टींग,सर!” म्हणत त्याने कडक सल्यूट ठोकला. मला ‘सर’ म्हणणारं कुणीतरी आलं होतं याचा मला आनंद वाटला. माझ्यापेक्षा दीड दोन वर्षांनी धाकटा असणारा तो तरूण मला पाहताक्षणीच भावला. चारच महिन्यांपूर्वी माझ्या पलटणीत रुजू झाला होता. तो आता माझ्या हाताखाली असणार होता. मी त्याला या पलटणीच्या परंपरा,इतिहासाबद्दल शिकवू लागलो होतो. मी त्याला ‘बच्चा’ म्हणू शकत होतो…प्रेमानं.
१९९९ चा मे महिना होता. आणि एकेदिवशी खबर आली की आपल्या सीमेत काही घुसघोर आढळून आले आहेत. बर्फाच्या मोसमात इथे जीवघेणे हवामान असते…जगणे अवघड करून टाकणारे. म्हणून परस्पर सामंजस्य करारानुसार दोन्ही देशांच्या अतिउंचावरील सैनिकी-चौक्या रिकाम्या केल्या जातात. आणि बर्फ वितळताच पुन्हा दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या चौक्यांमध्ये परततात. पण यावेळी पाकिस्तानने आपल्या लष्कराला टोळीवाल्यांच्या वेशात बर्फ वितळण्यापूर्वीच या चौक्यांमध्ये पोहोचवले होते. आणि त्यातून भारताच्या चौक्यांवर ताबा घ्यायला लावले होते. शत्रू भारतीय सैनिकांची वाटच पहात लपून बसला होता. भारताला याची खबर खूप उशीरा लागली,दुर्दैवाने! खरी परिस्थिती काय आहे हे पहायला चौक्यांपर्यंत एक पाहणी पथक पाठवायचं ठरलं. एक अधिकारी आणि चार जवानांची पेट्रोलींग पार्टी. तिथली भयावह परिस्थितीच माहित नव्हती. त्यामुळे मोठी कारवाई करण्याचा विचार झाला नाही. फक्त पाहून यायचं होतं माघारी….रिपोर्ट द्यायचा होता.माझा ‘बच्चा’ मोठ्या उत्साहात पुढे आला आणि म्हणाला….सर,मी जातो! आणि पेट्रोल पार्टी निघाली. सोबत नेहमी असतात तेव्हढी शस्त्रं होती….त्यादिवशी बरेच बर्फ पडत होतं. १५ मे, १९९९ चा दिवस होता हा. सौरभ फार तर १६ तारखेला परतायला हवा होता. पण त्याला बजरंग पोस्टजवळ पोहोचायला दुसरा दिवस उजाडला. “जयहिंद सर,बजरंग पोस्टवर मोठ्या संख्येने पाकिस्तानी आक्रमण झालं आहे…आमच्यावर गोळीबार होतो आहे…आमच्याकडे गोळाबारूद पुरेसा नाहीये…पण आम्ही सर्वजण लढू…तुमची मदत पोहोचेपर्यंत..ओव्हर अॅन्ड आऊट! आणि यानंतर सौरभचा काहीही पत्ता नाही. १६ मेची रात्र सरली. मग मात्र आम्ही सर्वच जण अस्वस्थ झालो. १७ तारखेला लवकरच मी ३० जवान घेऊन निघालो. यावेळेस दारूगोळा पुरेसा घेतला…..दिवसभर चढाई करीत बजरंग पोस्टच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पहाडावरून आमच्या पार्टीवर जोरदार गोळीबार,तोफांचा मारा सुरू झाला. पाहतो तर, आमच्यापेक्षा कित्येक पट संख्येने शत्रू वर निवांतपणे लपून आमच्यावर सहज नेम धरून हल्ला चढवतो आहे. सोबतच्या ३० माणसांचे प्राण आता संकटात होते. माघारी फिरणं युद्धशास्त्राला धरून होतं….मी सोबत्यांना पीछे हटो,निकल जाओ, असा आदेश दिला. वरून गोळीबार सुरूच होता. त्यांच्यावर कुणीतरी सतत गोळीबार करीत राहणं गरजेचं होतं..जेणेकरून माघारी जाणारे त्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात येणार नाहीत. ही ‘कव्हरींग फायर’ची जबाबदारी मी स्विकरली…मी त्यांचा नेता होतो! एक वगळता बाकी सारे जवान हळूहळू मागे सरकत सरकत सुरक्षित ठिकाणी पोहोचायला निघाले. पण माझा ‘बडी’ ‘सहकारी’ हवालदार राजवीर सिंग यांनी जणू माझा आदेश ऐकूच गेला नाही,असा अभिनय करीत दुश्मनांवर गोळीबार सुरु ठेवला. ‘पीछे जाईये, राजवीर जी!” मी पुन्हा ओरडलो. “नहीं,साहबजी. हम आपको यहां पर अकेला छोड के नहीं जायेंगे!” राजवीर सिंग यांनी हट्ट धरला. “यहां से जिंदा लौट जाना नामुमकीन है! आप बाल बच्चे वाले इन्सान हो! मेरी तो अभी शादी भी नहीं हुई है! निकल जाईये!
“नहीं,साहब !” राजवीर म्हणाले..त्यांची नजर दुश्मनावर आणि बोटं रायफलच्या ट्रिगरवर…तुफान गोळीबारानं पहाड हादरून जात होते.
“यह मेरा हुक्म है,हवालदार राजवीर !” मी ओरडलो. त्यावर तो ज्येष्ठ सैनिक म्हणतो कसा…”यहां से जिंदा लौटेंगे तो आप मेरा कोर्ट मार्शल कर सकते हैं,साहब !” आणि असं म्हणत त्यांनी अंगावर गोळ्या झेलायला प्रारंभ केला. माझा नाईलाज झाला….मी नेम धरायला सुरूवात केली….दोघांनी मिळून किमान दहा दुश्मन तरी नष्ट केले असतील…पण त्यांची संख्याच प्रचंड होती. आमच्यावर आता एकत्रितच गोळीबार होऊ लागला…आडोसा कमी पडू लागला…त्यांचे नेम अचूक होते….राजवीर माझ्या आधी शहीद झाले…माझ्याही डोक्याचा दोनदा वेध घेतला दुश्मनांच्या गोळ्यांनी. आमच्या हातांची बोटं ट्रिगरवरच होती…आमचे प्राण निघून गेले होते तरी!
मग सुरु झाला खरा रणसंग्राम. या धुमश्चक्रीत आमचे देहही आपल्या सैन्याला तब्बल छपन्न दिवस ताब्यात घेता आले नाहीत. पण आमच्या देहांच्या साक्षीने आपल्या सैन्यानं पाकिस्तान्यांना धूळ चारली. आणि मोठ्या सन्मानाने माझा आणि राजवीर यांचा उरलासुरला देह ताब्यात घेतला. सन्मानपूर्वक आदरांजली वाहिली सर्वांनी. राजवीर त्यांच्या घरी आणि मी आपल्या घरी आलो आहे….अखेरचा निरोप घ्यायला!
ह्या जन्मीचं मातृभूमीप्रती असलेलं माझं कर्तव्य तर पूर्ण झालं आहे…तुझे ऋण फेडायला फिरूनी नवा जन्मेन मी ! जय हिंद ! “
( जुलै, २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कारगील येथे झालेल्या सशस्त्र संघर्षाला पंचवीस वर्षे पूर्ण होताहेत. या संघर्षातले पहिले हुतात्मा ठरले ते कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्यासोबतचे पाच जवान. कालिया साहेबांचा शोध घेण्यास गेलेल्या कॅप्टन अमित भारद्वाज साहेब आणि त्यांच्या सोबतच्या हवालदार राजवीर सिंग यांना १७ मे रोजी हौतात्म्य प्राप्त झाले. कॅप्टन भारद्वाज साहेबांची ही शौर्यगाथा त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिली आहे… त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून देण्यासाठी. कॅप्टन भारद्वाज साहेबांनी लेफ्टनंट ( पुढे कॅप्टन झालेल्या) सौरभ कालियासाहेबांचे स्वागत करणारी एक हस्तलिखित चिठ्ठी छायाचित्र स्वरूपात इथे दिली आहे. जय हिंद !)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈