श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
इसवी सनाचे सतरावे शतक. तो काळ ‘मोगलाई’चा. ‘दहशतवाद’, ‘असहिष्णुता’ हे शब्द एखादवेळेस त्या काळातील शब्दकोषात देखिल नसतील, पण सामान्य मनुष्य ‘याचि देही याचि डोळा’ ते अनुभवत होता. सुलतानी आणि अस्मानी संकट एकाच वेळेला महाराष्ट्रावर आणि एकूणच भारतावर घिरट्या घालीत होते. ‘स्वधर्म’ नावाचा काही धर्म असतो आणि तो प्राणपणाने जगायचा, जपायचा असतो हे सांगण्याचे धाडस करण्याची तयारी देखील त्या काळात फार कमी लोकांची होती. एखादया भरलेल्या शेतात टोळधाड यावी आणि काही क्षणांत ते शेत फस्त करून टाकावे, अगदी अशाच पद्धतीने मोगल आणि इतर आक्रमक गावावर हल्ला करायचे आणि सोन नाणं लुटून न्यायाचेच, पण गावातील लेकीबाळी एकतर पळवून न्यायचे किंवा ‘नासवून’ टाकायचे. जनतेनं दाद मागायची कोणाकडे? कारण हिंदूंना राजा नव्हताच. काही सरदार होते, पण तेही बादशहाचे मांडलिक. त्यामुळे तेही वतने टिकविण्यासाठी आपल्याच लोकांशी भांडत होते. ब्राह्मण आपल्या कर्मकांडात गुंतले होते, क्षत्रिय तत्कालीन राज्य व्यवस्थेचे मांडलिक झाले होते. वैश्य जीव मुठीत धरून व्यापार करीत होते आणि तथाकथित शूद्र आपापले जीवन कसेतरी जगत होते. काहीही करून फक्त जीव वाचविणे हाच हाच त्याकाळातील जगण्याचा मूलमंत्र झाला होता. या सगळ्याचे वर्णन करण्यासाठी एकच सुयोग्य शब्द आहे ‘मोगलाई’
इसवीसनाच्या तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका हातात घेतली आणि भक्तिमार्गाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यात प्राण ओतण्याचे, त्याच्यातील ‘स्व’त्व जागृत करण्याचे कार्य चालू केले. त्या काळात समाजातील सात्विकता जवळ जवळ नष्ट होत चालली होती. चांगुल्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उरला नव्हता. त्याकाळात मनुष्याचा चांगुलपणा वरील विश्वास निर्माण करणे आणि तो टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे होते. सर्व संतांनी अगदी तेच केले. दुष्काळ पडला तर शेतकरी सर्वप्रथम आपले बियाणे सुरक्षित ठेवतो याच सुत्राप्रमाणे माऊलींनी आणि नंतर तत्कालीन संतांनी समाजातील सात्विकतेच्या बीजाचे संरक्षण आणि संवर्धन केले. माऊलींचा हरिपाठ, संत एकनाथांचे भारूड आणि इतर संताचे अभंग यामुळे समाजमन भक्तिरसात न्हाऊन निघत होते आणि ईश्वराच्या, नामाच्या सान्निध्याने मनुष्यातील सत्वगुण वृद्धीगंत व्हायला बळ मिळत होते. मनुष्याच मन विकसित करणे, हे फार अवघड काम. त्याहून अवघड म्हणजे निद्रिस्त समाजाला जागृत करून त्यास विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत करून राष्ट्रकार्य, समाजकार्य करण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे काम हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखे. माणूस जिवंत ठेऊन जुनं म्हणजे सडलेले हृदय बदलून तिथे नवीन हृदयाचे रोपण करायचे. खरे हृदय बदलणे त्यामानाने एकवेळ सोपे म्हणता येईल, पण मनुष्याचे विचार समूळ बदलणे हे गोवर्धन पर्वत उचलण्यापेक्षा महाकठीण. पण आपल्याकडील संत मंडळी हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांनी ही सर्व शस्त्रक्रिया बेमालुमपणे आणि निष्णात तंत्रज्ञाप्रमाणे पार पाडली. ही शस्त्रक्रिया झाल्याचे सामान्य मनुष्याला कळलेदेखील नाही, पण त्याचा ‘रोग’ मात्र बरा होण्यास निश्चित मदत झाली असे खात्रीने म्हणता येईल.
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥”
(संदर्भ:- अभंग क्रमांक १०१४ सार्थ श्रीतुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था) म्हणतात ते उगीच नव्हे!
मराठवाड्यातील जांब गावातील एका घरात एका मुलाचा जन्म झाला. अर्थात मुलाचा जन्म होणे ही तशी सामान्य घटना. पण त्याच मुलाने पुढील काळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपले आपल्या गावाचे, प्रांताचे नव्हे तर देशाचे नाव जगप्रसिद्ध केले, इतकेच नव्हे तर आज चारशे वर्षांनंतरही ते नाव एक दीपस्तंभ बनून आजच्या पिढीला मार्गदर्शन करीत आहे. माझ्यासारख्या एका अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यास त्यांच्या चरित्राचे स्मरण करावेसे वाटते, त्याचे कर्तृत्व पुन्हा एकदा समाजाला सांगावेसे वाटते, यातच त्यांच्या अलौकिक आणि अपौरुषेय कार्याचे महात्म्य दडले आहे.
घरात अनेक पिढ्या चालत आलेली रामभक्ती !! मोठे बंधु त्यामानाने ज्येष्ठच. त्यामुळे हा बाळ आपल्या बालमित्रमंडळीत जास्त रमायचा. सुरपारंब्या आणि इतर तत्कालीन खेळ हे वेळ घालविण्याचे साधन. थोडा मोठा झाल्यानंतर मात्र सूर्यनमस्कार, पोहणे अशा गोष्टीत त्यास रस वाटू लागला. एकीकडे रामभक्ती चालू होतीच. आठव्या वर्षी मुंज झाली आणि अचानक वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनाचा बाळाच्या मनावर खोल परिणाम झाला. बाळ अंतर्मुख झाला. त्याचवेळेस गावात टोळधाड आली, समाजाची विदारक परिस्थिती त्याच्या लक्षात आली आणि या अंतर्मुखतेस एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले.
“धर्माच्या करिता आम्हांस जगती रामाने धाडियले।”
रामकार्य करण्याचे ठरले आणि हनुमंत त्यांचा आदर्श, मार्गदर्शक आणि मित्र झाला. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हनुमंताला आपल्या सोबत ठेवले. प्रत्येक गोष्ट हनुमंताला साक्षी ठेऊन आणि समर्पण करून केली. आयुष्यात परमेश्वरावरील अतूट श्रद्धा आणि शुद्ध साक्षीभाव किती काम करतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण !! आयुष्याचे ध्येय ठरले, निश्चय दृढ झाला, आता कृती !! सामान्य मनुष्याचे असामान्य संकल्प आईच्या अश्रूत वाहून जातात असा आपल्याकडील अनेक लोकांचा अनुभव आहे. ‘हुंडा मला नकोय पण आईसाठी घेतोय’, मला काही नकोय मात्र आईची इच्छा मोडवत नाही’, आई हो म्हणाली असती तर मी सैन्यात भरती झालो असतो, अशी ‘कारणे’ देणारी मंडळी आज देखील आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. पण याचे ध्येय पक्के होते, विशाल होते. ध्येय ‘रामराज्य’ प्रत्यक्षात आणण्याचे होते. हिंदूंना स्वतःचे सार्वभौम सिंहासन मिळावे, हिंदूसमाज जिंकू शकतो, हिंदू मनुष्य सार्वभौम राजा होऊ शकतो, इतकेच नव्हे हिंदू राजे जिंकलेल्या राज्याचा विस्तार करु शकतात, हिंदू ‘राज्य’ करु शकतात, हिंदू कारखाने चालवू शकतात, व्यापार करू शकतात, समुद्रावर सत्ता गाजवू शकतात, गडकिल्ले बांधू शकतात, शेती विकसित करू शकतात, हे दाखवून देण्याचा निश्चय झाला होता, आता हा संकल्प फक्त प्रत्यक्षात आणायचा होता. एका वाक्यात सांगायचे तर *सामान्य मनुष्यात ‘राष्ट्रभक्ती’, ‘राष्ट्रीय दृष्टीकोन’ राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम करायचे होते.
जगात कोणतीही गोष्ट दोनदा घडते. एकदा कोणाच्या तरी मनात आणि नंतर प्रत्यक्षात! हा संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी पारंपरिक पद्धतीने संसारात रमणे सोयीचे नव्हते, म्हणून आईच्या शब्दांसाठी बोहल्यावर चढलेला हा मुलगा, “शुभमंगल सावधान….” ऐकताच ‘सावधान’ झाला आणि गोरजमुहूर्ताचा फायदा घेऊन बोहल्यावरून पळून गेला. त्याला पारंपरिक संसारात न अडकता विश्वाचा संसार करायचा होता. “चिंता करतो विश्वाची”, असा विचार करणाऱ्या मुलाला ‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈