श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ कृष्णा – आणि तिच्या काठावरची सांगली !! – लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कृष्णा…कसलंही वलय नसलेली नदी..गंगेइतकं तिला आध्यात्मिक महत्त्व नाही, साधुसंन्याशांना तिची ओढ नाही.यमुनेसारखी रासलीलेची अद्भुत कहाणी तिच्या काठावर नाही,की जगातलं कुठलंही आश्चर्य पाहायला लोक तिच्या काठी येत नाहीत.नर्मदेसारखी कुणी तिची परिक्रमा करीत नाही….या कृष्णेच्या काठावरची सांगलीही तशीच.साधीसुधी…खरं म्हणजे किती मोठी माणसं तिच्या अंगाखांद्यावर खेळली आहेत.पण तिला त्यांच्याबद्दल प्रेम आहे.गर्व नाही.
सांगली..नाट्यपंढरी ! पहिलं मराठी नाटक विष्णूदास भावेंनी सांगलीत सादर केलं.आजही त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या कारकीर्दीत मानाचा क्षण असतो.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल यासारखे नाटककार सांगलीचे.
खाडिलकर हे नाव संगीतासाठीही प्रसिद्ध! महान गायिका इंदिराबाई खाडिलकर, आशा खाडिलकर इथल्या. आज त्यांची नात वर्षा खाडिलकर (भावे) गायकगायिकांची नव्या पिढ्या घडवतेय आणि त्यांना जुन्या सांगीतिक वारशाशी बांधून ठेवतेय.
बालगंधर्व मुळात सांगलीच्या नागठाण्याचे. ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.दा. पानवलकर, कवि सुधांशू, श्रीनिवास जोशी यासारखे अनेक साहित्यिक सांगलीने दिले. नाटककार वसंत कानेटकरांचे वडील कवि गिरीश सांगलीत होते. गरवारेंसारखे उद्योजक सांगलीतच जन्मले आणि पार लंडनला गेले. पारतंत्र्याच्या काळात त्यांनी ब्रिटिश नोकर म्हणून ठेवले. आणि चितळेंची दूध उत्पादने सांगलीत भिलवडीलाच होतात. सराफ बाजारातील अत्यंत विश्वासू नाव पु. ना. गाडगीळ सांगलीचे.त्यांच्या पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील दुकानातही सांगलीच्या राजेसाहेबांचा आणि राणीसाहेबांचा फोटो आहे.
संपूर्ण हिदुस्थानात प्रसिद्ध असलेली तंतूवाद्ये तयार होतात सांगलीच्या मिरजेत.
आजच्या काळातील क्रिकेटियर स्मृती मानधना सांगलीची.
पण खेळांची परंपरा सांगलीत पूर्वीपासून आहे.इथे मुली उत्तम मलखांब खेळतात. माधवनगरसारख्या सांगलीच्या छोट्या गावात मुलींनी कबड्डीमधे परदेशात नाव कमावलं होतं आणि त्यांचा कोच त्या काळीही एक तरूण मुलगा होता. त्याच्याबरोबर मुली अतिशय सुरक्षित होत्या. मुलींचं झाडावर चढणं,मैदानी खेळ खेळणं माधवनगरला नवं नाही.पण ते इतकं साहजिक होतं,की ‘मुलगी असूनसुध्दा ‘असं कधी कुणी म्हणायचंही नाही…सांगलीतल्या बुधगाव या छोट्या खेड्यात एक स्त्री शाहीर होत्या,ज्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपल्या डफाची थाप वाजवली होती. यांच्यापैकी कुणीही स्त्री स्वातंत्र्याचा खास डंका मात्र वाजवला नाही. स्त्रीत्वाचे सगळे गुणधर्म, नियम मर्यादा पाळून आपापल्या आवडीच्या क्षेत्रात बिनधास्त मुशाफिरी केली त्यांनी..कोणताही आव न आणता.अशा खूप गोष्टी सांगता येतील. नावं घेता येतील.हळद, द्राक्षं यांच्या उत्पादनात सांगलीच आजही प्रथम क्रमांकावर आहे.
शहराच्या सोयी असलेलं हे छोट्या गावाचं फीलिंग देणारं शहर मला नेहमीच त्याच्या साधेपणानं मोहवतं. हा साधेपणा इथल्या माणसांमधेही मुरलाय. यांना स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आहे..गर्व नाही..किंबहुना..कसलाही आव नाही हेच यांचं वैशिष्ट्य! सांगलीकरांना आपल्या गावाबद्दल प्रेम आहे,पण इतर गावांबद्दलही आदर आहे.
माझ्या मुलाचं लग्न जमवताना एक सांगलीचं स्थळ आलं होतं.काही कारणानं आपला योग नाही हे सांगायला मी मुलीच्या आईला फोन केला आणि म्हटलं,”तुम्ही काळजी करू नका. हा योग नसला,तरी खूप छान जोडीदार मिळेल तिला. तिला खूप शुभेच्छा.”
त्या पटकन म्हणाल्या,”तुम्हीपण सांगलीच्या ना?” “हो.” मी म्हटलं.
त्यावर त्या म्हणाल्या,”सांगलीत आलात कधी तर आमच्याकडे जरूर या.माहेरवाशीण म्हणून या.” ज्या बाईशी आपला संबंध येणार नाहीये,तिला असं निमंत्रण सांगलीतून सहज मिळू शकतं……
…२००५ चा पाऊस! कधी नव्हे ते कृष्णेनं मर्यादा सोडली.एरवी पूर आला,तरी आततायी बाईसारखं थैमान घालणं हा तिचा स्वभाव नाही. तिच्या काठच्या लोकांना ती आईच वाटते.पण ते वर्ष वेगळं होतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरात पाणी शिरू लागलं. साठवणीतलं सगळंच धान्य ती घेऊन जाणार हे दिसत असूनही तिनं पटकन दोन मुठी तांदूळ,एक खण, नारळ घेऊन कृष्णेची ओटी भरली.आम्हाला सहज साध्या श्रध्देनं नंतर हे सांगताना ती म्हणाली,”अगं,कृष्णामाई एवढी दारात आली,तसंच कसं पाठवायचं तिला?” तिच्या या भावनेत सांगली आहे.
माझ्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं.ती तेव्हा महिला मंडळाचा एकपात्री प्रयोग बसवत होती. तिनंच लिहिलेला.दोनतीन जणी दुपारी प्रॅक्टिसला येणार होत्या.मी आईच्या ऑपरेशनसाठी माहेरी होते. आईच्या मैत्रिणींसाठी काही करावं म्हणून मी उठले,तर एकजण म्हणाल्या,”हे बघ,मी लिंबू सरबताचं मिक्श्चर करून आणलंय.तू फक्त पाणी घालून दे.” ” तुम्ही कशाला आणलंत मावशी?” म्हटल्यावर त्या म्हणाल्या,”अगं,आमच्या सगळ्यांसाठीच तू माहेरवाशीण. आईची सेवा कर..पण आम्ही नको का मदत करायला?”या प्रेमात सांगली आहे.
माझी मैत्रिण नीता जोशी आकाशवाणीवर बरीच वर्षं काम करत होती.आताही एका एनजीओ ने चालवलेल्या रेडिओ स्टेशनची डायरेक्टर आहे.अंगात असंख्य कला असणारी ही …एका प्रोग्रामसाठी मुंबईत गेली.”आपलं खास वैशिष्ट्य दिसेल अशी वेषभूषा असूदे ..” हा आदेश होता.
ती जशी नेहमी राहते,तशीच गेली..साडी,लांबसडक एक वेणी,हातात बांगड्या,कुंकू…अर्थातच पहिल्यांदा माॅडर्न पोषाखातल्या लोकांनी लक्ष दिल नाही.तिचं प्रेझेंटेशन झालं आणि तिच्याभोवती गराडा पडला..आम्हाला माहितच नाही तुमचं टेक्निकल नाॅलेजही साॅलिड आहे हो…असं म्हणत.
तिचं म्हणणं,”मी ठरवलं होतं, माझा साधेपणा हेच माझं वैशिष्ट्य! वेगळा मेकओव्हर मी करणार नाही.” तिच्या या साधेपणात सांगली आहे.
मुंबईला तिच्या गतीचा अभिमान आहे,आर्थिक सत्तेचा झगमगाट,बाॅलिवूडचा लखलखाट आहे..
पुण्याला पुणं सोडून भारतातलं सारंच कमी दर्जाचं वाटतं..
विदर्भाला आपल्या वैदर्भीय संस्कृतीचा..खाद्य पदार्थांचाही गर्व आहे.
सांगलीचे वैशिष्ट्य एवढंच,की तिला कुठलीच गोष्ट म्हणजे आपलं वैशिष्ट्य वाटत नाही..तिला सगळ्याच गावांचं कौतुक आहे. तिच्या मते असतातच की माणसांमधे कमीजास्त गुण…आणि दोषसुध्दा. साधेपणा, सहजता हेच तिचं वैशिष्ट्य!
लेखिका : सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
पुणे
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈