श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ “कथा वक्तृत्वाची” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
श्री. विश्वास नांगरे पाटील आणि प्रा. शिवाजीराव भोसले
आपलं पहिलं वहीलं भाषण अनेकांना आठवत असतं. ते बहुतेक वेळा फसलेलं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं असंच एक पहिलं भाषण. प्राथमिक शाळेत होते ते.आणि प्रसंग होता टिळक जयंतीचा. व्यवस्थित पाठ केलेलं भाषण ऐनवेळी ते विसरून गेले. सुरुवात तर केली होती..पण पुढे आठवेना.
‘एवढं बोलुन मी माझे भाषण संपवतो’ असं म्हणुन त्यांनी जयहिंद केलं.नंतर त्यांना असं स्टेजवर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली ती थेट कॉलेज मध्ये.
‘मला पडलेलं स्वप्न ‘ असा विषय दिला होता.सोमवारी ती स्पर्धा होती.आदल्या दिवशी त्यांनी एक चित्रपट बघितला होता..लालपरी नावाचा.एका गरीब मुलाला एक लालपरी भेटते.. त्याच्या आयुष्यातील अडचणी ती दुर करते..त्याची स्वप्न ती पुर्ण करते असं काही तरी ते कथानक होतं.
विश्वास नांगरे पाटलांनी कोणतीही तयारी न करता ते कथानकच अगदी समरसून सांगितलं. भाषणाला टाळ्या मिळवल्या.. पहिला नंबरही मिळाला.
अँकरींग करणे, किंवा आरजे यासाठी पण वक्तृत्व आवश्यक असतेच.कोणाला त्यात करीअर करायचे असते कोणी केवळ हौस म्हणून याकडे बघतात.पण एक उत्तम वक्ताच उत्तम ॲंकर होऊ शकतो.मग उत्तम वक्ता होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?
” युवकांनी वक्ता होण्याची इच्छा जरूर बाळगावी.. पण त्यात अनिवार अधिरता नसावी.वक्तृत्व हे जोपासलेल्या व्यक्तीमत्वाला आलेले फळ असते.साधनेची सुदिर्घ वाट..आणि त्यानंतर शेवटी शेवटी येणारी प्रसिध्दीची पहाट ” —- हे विचार आहेत प्रा.शिवाजीराव भोसले यांचे. वक्तृत्व म्हणजे काय.. त्यासाठी नेमके काय करावे लागते.. मनाची,विचारांची मशागत कशी करावी,यांचं मार्गदर्शन शिवाजीराव भोसले करत असत.
वक्तृत्व आणि शिवाजीराव यांना आपण वेगळे करुच शकत नाही. ही कला त्यांनी कशी प्राप्त केली? त्यांनी विद्यार्थी दशेत असताना खूप भाषणे ऐकली.. त्यात श्री. म.माटे..बाळशास्त्री हरदास.. ना.सी.फडके..साने गुरुजी.. नंतरच्या काळात बाबासाहेब पुरंदरे.. इंदिरा गांधी.. वाजपेयी असे अनेक वक्ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे.
शिवाजीराव म्हणतात….
“एखादा वक्ता बोलण्यामुळे प्रसिध्दिस येतो.. पण तो ऐकण्यामुळे घडतो.. वाढतो हे आपण विसरून जातो. गायनात आणि वक्तृत्वात श्रवणाचे महत्त्व मानावेच लागेल. संगीत श्रवणाने कान तयार होतो, तर व्याख्यान ऐकून मन तयार होते. इतरांना काहीही ऐकवू पाहणाऱ्यांनी आरंभी खूप ऐकले पाहिजे. श्रवणाशिवाय आकलनाचे क्षितिज विस्तारत नाही.. बहुश्रुतपणा प्राप्त होत नाही.”
उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे हे जसे शिवाजीराव सांगतात.. तसे काय करु नये याचेही ते मार्गदर्शन करतात.दाद किंवा प्रतिसाद वक्त्याला हवाच असतो.. पण सुरुवातीला तो मिळण्याची शक्यता कमीच. शिवाजीराव सांगतात.. श्रोत्यांचे लक्ष विचारांकडे कमी आणि शब्दांकडे अधिक असते .त्यामुळे नवखा वक्ता चमकदार शब्दांचाच आश्रय घेतो.पण नंतर त्याला ती चटकच लागते. सुमार शब्दयोजना करून टाळ्या मिळवण्यात तो धन्यता मानतो आणि नंतर या पाशातून बाहेर पडणे त्याला अशक्य होते.
ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शिवाजीराव सांगतात..
“ वक्तृत्व ही मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते.. रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत रहातात.. त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होते.”
आपल्या पहिल्या..खरंतर दुसऱ्या भाषणात यश मिळाल्यावर विश्वास नांगरे पाटलांचा आत्मविश्वास वाढला.त्यांनी ठरवलं..आता झाकली मूठ ठेवायची नाही. कोणत्याही स्पर्धेत उतरायचं .. .. भिडायचं …लढायचं.. जिंकलो तर उत्तम, हरलो तर विचार मांडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.
आणि हा आत्मविश्वास त्यांना मिळाला तो आपल्या बोलण्यातून…. आपल्या वक्तृत्वातून.
(१ जून – विश्वास नांगरे पाटील यांचा जन्मदिवस… .. त्या निमित्ताने…)
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈