श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ भल्याने परमार्थी भरावे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
भल्यानें परमार्थीं भरावें ।
शरीर सार्थक करावें ।
पूर्वजांस उद्धरावें ।
हरिभक्ती करूनी ॥
— समर्थ रामदास .
अर्थ :- चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवद्भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा.
प्रत्येक मात्यापित्याना आपली संतती निकोप निपजावी असे वाटणे स्वाभाविक आहे. यासाठी प्रत्येक आई बाप असो वा पालक असा प्रयत्न करीत असतो. एखाद्याच्या घरात एखादा मुलगा अथवा मुलगी जन्मास आली, पण उपजताच त्यामध्ये व्यंग असेल तर त्याचा आईबापाला आणि समाजाला काय लाभ ? उलट मनःस्तापच व्हायचा. आणिक एक कल्पना करू. मूल सदृढ आहे, हुशार आहे , पण वृत्तीने अगदीच तामसी आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत जोड मनोरे विमानाच्या धडकीने उद्ध्वस्त केले गेले. ते दोन्ही तरुण उच्च विद्या विभूषित होते, पण कुसंस्कार असल्याने, तामसी असल्याने त्यांनी स्वतःचा नाश केलाच पण अनेक कुटुंबाचा विध्वंस केला. अशी संतती आई बापाचा आणि कुळाचा कसा उद्धार करू शकेल….? याउलट, एखाद्या घरात मूल जन्माला आले ,कदाचित ते रूपवान नसेल, पण गुणवान असेल, शीलवान असेल, तर ते आपल्या आई बापाचा आणि कुळाचे नाव उज्ज्वल करू शकेल….! यापैकी कोणती संतती आपल्या घरी जन्माला यावी असे वाटते….?
भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की सात्विकतेचे बीज एका जन्मात वृध्दींगत होत नाही. ती खूप मोठी प्रक्रिया आहे. रामाच्या कुळात अनेक पिढ्यांनी आधी आपल्या शुद्ध आचरणाने सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुसंस्कारित केले, त्याचे फळ म्हणून प्रभू श्रीरामांचे दिव्य चरित्र आपल्या समोर आले. समर्थ रामदासांच्या कुळात अनेक पिढ्या सूर्य उपासना होती. हे अनेक संतांच्या बाबतीत पाहायला मिळते. माउलींनी सात्विकतेचे बीज पेरले आणि यथावकाश त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने फळ लाभले….! आपण यावर मूलभूत चिंतन करावे, आपल्याला अनेक गोष्टी आपसूक कळून येतील.
हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचा हेतू हा की याचे महत्व वाचकांच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या पूर्वजांनी आपले धार्मिक कुलाचार विपद स्थितीत सुध्दा टिकवले, पण चार इयत्ता शिक्षण जास्त झाल्याने लोकांनी कुलाचार आणि श्राद्ध पक्ष करणे बंद केले. माथी टिळा लावायला आपल्याला लाज वाटू लागली, ….., अशा अनेक गोष्टी आहेत, पटतंय ना ?
महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात, ” जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. “
सर्व संतांनी सांगितले की हरि भक्ती करून आपला आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार करता येतो किंवा उद्धार होत असतो….!आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आपण एक उदाहरण पाहू. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की जर एखाद्या हार्ड डिस्क वरील काही mb भाग currupt झाला तर पूर्ण हार्ड डिस्क खराब होते, निकामी होते. मनुष्याच्या मेंदूत किती gb ची हार्ड डिस्क भगवंताने बसवली आहे, याचे गणित मानवी बुध्दीच्या बाहेरचे आहे. त्याच्यावरील किती mb आपण आपल्या दुर्बुद्धी ने currupt केल्या असतील, याचे आपल्याकडे मोजमाप नाही तरीही आपली हार्ड डिस्क बाद करीत नाही तर तो आपल्याला हार्ड डिस्क सुधारण्याची संधी मरेपर्यंत देत असतो. हा भगवंताचा आपल्यावरील सर्वात मोठा उपकार समजायला हवा. हे केवळ मनुष्य देहातच शक्य आहे. आपण यावर स्वतः चिंतन करावे.
असे म्हणता येईल की जेव्हा मनुष्य एकेक नाम घेत जातो, त्या प्रमाणात आपल्या मेंदूतील हार्ड डिस्क मधील एकेक bite शुद्ध होत जाते…
समर्थ आपल्याला हेच सांगतात की कोणत्याही मार्गाने मेंदूतील हार्ड डिस्क शुद्ध करून घ्यावी. आपल्या शरीरात ४६ गुण सूत्रे असतात. त्यातील २३ आई कडील आणि २३ बाबांकडील म्हणता येतील. मनुष्याने ब्रम्हाला जाणून घेतले तर त्याच्या आईकडील २१ आणि बाबांकडील २१ अशा एकूण ४२ पिढ्यांचा उद्धार होत असतो असे आपले धर्म शास्त्र सांगते.
सर्व संत सांगतात की नर देहाचा मुख्य उपयोग शरीर उपभोगासाठी नसून भगवंताची प्राप्तीसाठी आहे. आपण तसा प्रयत्न करून पाहू.
जय जय रघुवीर समर्थ…
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈