सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शौर्य मरण’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित

महापराक्रमी  पृथ्वीराज चौहान सुलतानाविरुद्ध लढा देऊन,  विजयश्रीची माळ लेऊन परतले होते.

समोर पराजित झालेला सुलतान खाली मान घालून उभा होता. पृथ्वीराज महाराजांनी मोठा लढा देऊन विजयश्री मिळवली होती तरीही, पृथ्वीराज चौहानाचे पाय जमिनीवरच होते. अभयदान देणारा दाता नेहमी श्रेष्ठच असतो नाही कां? आणि त्या श्रेष्ठत्वाला स्मरून त्यांनी सुलतानाला अभय देऊन  बंधमुक्त केलं  होतं. 

पुढे अशा घनघोर लढाईची पुनरावृत्ती दोन वेळा झाली. विशाल अंतःकरणाच्या चौहानांनी सुलतानाला तीन वेळा अभय दिलं. पण सूडाच्या भावनेने, अहंकाराने पेटलेल्या सुलतानाने, त्या सैतानाने, आपल्या उपकार कर्त्यावरच चाल करून त्याचा पराभव केला. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो ना !  तसंच  झालं. सुलतानाने,घनघोर प्रबळ सैन्याच्या बळावर चौहानांचा पराभव केला. आणि तो महापराक्रमी नरसिंह पृथ्वीराज चौहान शत्रूच्या जाळ्यात अडकून जायबंदी झाला.

पिसाळलेला सुलतान शब्दांचे आसूड फटकारून विचारत होता,  “बोल चौहान क्या सजा   चाहिये  तुझे ? अब तो तुम हमारे कब्जेमे हो l और हमारे कैदी बन गये हो l  अब तुम्हारे लिये एकही सजा काफी है l हमारा इस्लाम धर्म स्वीकार करो …l बस यही एकही रास्ता है तुम्हारे लिये l “  

संतापाने लालबुंद झालेला तो नरकेसरी त्वेषाने म्हणाला, ” हमे सजा देनेवाले तुम कौन हो सुलतान? हमारी जान जायेगी लेकिन जबान नहीं जायेगी l हम जानकी कुर्बानी करेंगे लेकिन अपना धर्म कभी नही छोडेंगे ! “ डोळ्यातून अंगार ओकत दुभाषाला चौहान म्हणाले  ” सांग तुझ्या पाखंडी सुलतानाला, शरणागताला अभय देणाऱ्या धर्माची आमची जात आहे. तर कपट नीतीने उपकारकर्त्यावरच उलटणारी  तुझी सापाची जात आहे. अभय देऊन विषारी सापाला दूध पाजण्याची चूक झालीय आमच्याकडून.  प्राण  गेला तरी चालेल. पण इस्लाम धर्म आम्ही कधीही स्विकारणार नाही. आमच्या धर्माशी शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठच राहू.”  

चौहानांच्या डोळ्यातील अंगार बघून सुलतान आणखीनच चवताळला. त्या क्रूरकर्माने त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा फर्मावली  आणि तो पराक्रमी निरपराधी धर्मनिष्ठ पुरुष पृथ्वीराज चौहान पुरता  जायबंदी झाला. अनेक प्रकारे त्याचा छळ झाला, पण  निश्चयापासून  तो शूरवीर  जराही ढळला नाही . त्यांनी आपला धर्म सोडला नाही . त्यांच्या एकनिष्ठतेची आणि त्यांच्यावर चाललेल्या अन्वनित अत्याचाराची  बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या राज्यात सगळीकडे पसरली. चौहानांची प्रजा कासाविस झाली. स्वामीनिष्ठ सेवक बैचेन झाले .आणि मग त्यांच्यातलाच एक सेवक मनाशी मनसुबा रचून सुलतानासमोर हाजिर झाला. आणि म्हणाला …” आपको  सादर प्रणाम सुलतानजी l एक शेवटची संधी आम्हाला द्या. आमचे महाराज आवाजाच्या दिशेने निशाणा साधण्यात तरबेज आहेत . तुम्ही एकदा परीक्षा तर पहा ..  त्यांचा नेम चुकला तर मग खुशाल त्त्यांच्यावर तलवार चालवा .” 

सुलतान छद्मीपणे हसून म्हणाला, ” पागल हो गये क्या? वो अंधा क्या तिरंदाजी करेगा ? उसकी आखोंकी  रोशनी तो गायब हो गयी है l  मनावर कमालीचा ताबा ठेवत, सेवक शांतपणे म्हणाला, ” एक..  सिर्फ एक बार पहचान कर लो सुलतानजी” l अशी विनंती केल्यावर अखेर उत्सुकतेपोटी सुलतान तयार झाला .

मैदानात मोठे लोखंडी गोळे ठेवले गेले.आपल्या प्रजेसह, सैन्यासह,सुलतान तिथे विराजमान झाला. एक अंधा आदमी निशानेबाजी क्या करेगा ? हा  कुचकट भाव मनात होताच.  लोखंडी गोळे एकमेकांवर आदळले. ध्वनी झाला आणि बरोब्बर त्याच दिशेने पृथ्वीराजानी निशाणा साधला.. हे कसं शक्य आहे? सुलतान ठहाका मारून हसून म्हणाला  ” इसमे कुछ गोलमाल है” .. 

सेवकाने अदबीने उत्तर  दिले ” सुलतानजी आणखी एकदा परीक्षा पहायची असेल तर अवश्य बघा. पण त्याआधी तुम्ही स्वतः नेमबाजी करण्याची महाराजांना आज्ञा द्या, कारण आमचे महाराज तुमचे कैदी आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय ते बाण सोडूच शकत नाहीत.” या स्तुतीने सुलतान खुलला . त्याने विचार केला,  चौहान महापराक्रमी, युद्धकलानिपूण होगा तो क्या ! ये शेरका बच्चा पृथ्वीराज चौहान  अभी अपनेही कब्जे मे हैं ” …  आणि याचाच सुलतानाला गर्व झाला होता . मिशीवरून हात फिरवत सेवकाची विनंती त्यांनी मान्य केली. सेवक धावतच आपल्या स्वामींजवळ गेला. सुलतानाने विनंती मान्य केल्याची, सूचना, त्याला स्वामींपर्यंत पोहोचवायची घाई झाली होती .तो स्वामींजवळ पोहोचला. आपल्या स्वकीय भाषेतील कवितेच्या रूपाने, सुलतानाच्या आणि महाराजांच्या मधल्या अंतराचे मोजमाप, त्यानी आपल्या स्वामींना कवितेद्वारे सूचित केलं . जड साखळदंडांनी वेढलेला , दृष्टिहीन असा तो ‘ नरकेसऱी ‘  आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सज्ज झाला.

गडगडाटी हसून टाळ्या पिटत सुलतान छद्मीपणे म्हणाला .. ” चौहान.. अबे अंधे,कर ले नेमबाजी और दिखा दे अपनी होशियारी !”

आणि काय सांगावं मंडळी.. अहो  ! आवाजाच्या दिशेने बाण सूं    सूं   करीत सुसाट सुटला .आणि–आणि –सुलतानाच्या छातीत घुसला .कपट कारस्थानी सुलतान क्षणार्धात, खाली कोसळला. त्याच्या पापाचा घडा भरला होता. मैदान माणसांनी गच्च भरलं होतं. सुरक्षा दलाला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. हजारो लोकांच्या साक्षीने, सुसज्ज सैन्याच्या देखत, संरक्षक नजरेचं पात लवण्याच्या आतच पृथ्वीराजांच्या बाणाने शत्रूला यमसदनास  पोहोचवलं होत.   “दगा-दगा “असं ओरडतच सैन्य चौहानांच्या दिशेने धावले. आता खरी परीक्षा होती ती राजांच्या स्वामीनिष्ठ सेवकाची,

विजेच्या चपळाईने त्यानें राजांच्या छातीत पहिल्यांदा  खंजिर खुपसला  . लगेच तोच खंजिर   स्वतःच्या छातीत घुसवला . आणि- त्या दोघांना त्याक्षणीच  शौर्य मरण आलं. शत्रूच्या हाती पडून स्वामींची विटंबना होण्यापेक्षा त्या स्वामीनिष्ठ सेवकाने स्वामींबरोबरच स्वतःलाही खंजिर खूपसून ,मरणाला आपणहून कवटाळून संपवलं .आणि ते दोघे स्वामी, सेवक ‘ ‘  ‘नरवीरकेसरी ‘  अजरामर झाले.  

धन्य तो धर्मासाठी ,स्वामींसाठी प्राणांची आहुती देणारा कर्तव्यतत्पर सेवक आणि धन्य धन्य! ते पृथ्वीराज  चौहान .. .अशा शौर्य मरण पत्करणार्‍या त्या पराक्रमी ‘ नरकेसरींना ‘  माझा.  मानाचा मुजरा,– मानाचा मुजरा .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments