श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

चौदा हजार चारशे सदुसष्ट ललाटरेखा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याच्या कलेवरासोबत आलेल्या ज्येष्ठ सैनिकाने तिच्या हातात राष्ट्रध्वज सोपवला, तिला सल्यूट बजावला आणि तो बाजूला झाला. तो ध्वज घेऊन ती शवपेटीनजीक आली…तिने शवपेटीवर आपलं रिकामं कपाळ टेकवलं आणि शवपेटीवर पांघरलेल्या राष्ट्रध्वजावर आसवांचा शेवटचा अभिषेक घातला. तिला तिथून हलायचं नव्हतं…पण व्यवहाराला थांबून चालणार नव्हतं. शवपेटी वाहून आणणा-या एका सैनिकानं हातानंच इशाला केला….या ताईला आवरा कुणीतरी!   एक ज्येष्ठ सैनिक पुढे झाला…. तिने त्याच्याकडे म्लान वदनाने पाहिलं….तिने आपलं उजव्या हाताचं मनगट आभाळाच्या दिशेनं वळवलं, हाताचा तळवा उघडला….तोंडही उघडं होतं…पण आता त्यातून ध्वनि उमटत नव्हता…माझं कसं होणार? हा तिने न विचारलेला प्रश्न मात्र त्या ज्येष्ठ सैनिकाला मोठ्याने ऐकू गेला त्या गदारोळात….त्याने तिच्या डोक्यावर आपले दोन्ही हात क्षणभर ठेवले आणि मागे घेऊन नमस्कर मुद्रेत जोडले!…जाऊ दे, बेटी आता तुझ्या मालकाला शेवटच्या प्रवासाला! आम्ही असू तुझ्यासोबत! 

अंत्ययात्रेत तीन हुंदके उमटत होते…एक त्याच्या आईचा, एक वडिलांचा आणि एक त्याच्या पत्नीचा. तिच्या गर्भातल्या बाळाच्या हुंदक्याला त्याचा स्वत:चा असा आवाज नव्हता! 

सैनिकाच्या जाण्यानंतर निर्माण होणारं दु:ख कुणाचं धाकलं आणि कुणाचं थोरलं? आयुष्याच्या मध्यावर असलेल्या किंवा त्याच्याही पुढे गेलेल्या आई-वडिलांचं? की जिचं उभं आयुष्य पुढं आ वासून तिच्याच समोर उभं ठाकलं आहे त्या तरूण विधवा पोरीचं? 

गळ्यात मंगळसूत्र पडतं तेंव्हाच माहेर बुडतं लेकींचं आपल्याकडच्या. कुंकू नावाच्या गोलाकार समिंदरात बाई उडी घेते ती याच मंगळसूत्राच्या भरवशावर. यातील दोन वाट्या म्हणजे एकमेकांना जोडलेली दोन गलबतं. वल्हवणारा भक्कम असला आणि त्यानं किना-यापोत साथ दिली तर किनारा काही दूर नसतो फारसा…फक्त वेळ लागतो एवढंच. पण श्वासांचं हे वल्हं वल्हवणरा हात सैनिकाचा असला आणि तोच स्वत: आपल्या गलबतासह मरणाच्या खोलात अकाली गर्तेस मिळाला तर? त्याच्यासोबतचं गलबत भरकटणारच! वरवर सालस,शांत,समंजस भासणारा व्यवहाराचा समुद्र मग आपले खोलातले रंग पृष्ठभागावर आणायला लागतो….वादळापूर्वीची शांतता म्हणजे स्वप्नात अनुभवलेली खोटी गोष्ट वाटू लागते! गलबत आधीच इवलंसं….लाटांना फार प्रयास पडत नाहीत त्याला तडाखे द्यायला! 

मृत्यू अपरिहार्य आहेच. आणि त्यामुळे विवाहीत बाईच्या कपाळी येणारं वैधव्यही! हा मृत्यू एखाद्या सैनिकाला लढता-लढता आलेला असेल तर या वैधव्याची दाहकता आणखीनच गडद होत जाते भारतात! धारातीर्थी पडलेल्या सैनिकाच्या पत्नीने कोणत्याही रंगाची साडी परिधान केलेली असली तरी केवळ एक वाक्याने त्या साडीचा रंग पांढरा होऊन जातो….”कुंकू पुसून टाक,सूनबाई!” 

पतीचे निधन झालेली स्त्री विधवाच असते. पण कर्तव्यासाठी प्राणापर्ण केलेल्या सैनिकांच्या पत्नींना आताशा व्यवस्था वीरनारी म्हणू लागली आहे, आणि हेही नसे थोडके! अन्यथा पूर्वी सर्व ओसाड कपाळांची किंमत एकच असायची! खरं तर सैनिकाशी लग्न करणं हेच मोठं धाडसाचं काम आहे…या अर्थाने प्रत्येक सैनिक-पत्नी वीरनारीच मानली गेली पाहिजे. या महिला करीत असलेला शारीरिक,मानसिक त्याग प्रचंड आहे. असो. 

अविवाहीत हुतात्मा सैनिकाच्या आई-वडिलांचं दु:ख थोरलंच. पण विवाहीत हुतात्मा सैनिकाच्या घरात आणखी एक मोठं दु:ख मान खाली घालून बसलेलं असतं! ते दु:ख वेगानं धावत असतं अंध:कारमय भविष्याच्या दिशेनं! 

तिला हे माहीत आहे….तिने इतरांच्या बाबतीत हे होताना पाहिलं,ऐकलं आहे! किंबहुना सैनिकाशी लग्नगाठ बांधून घेताना तिला याची कल्पना कुणी स्पष्टपणे दिली नसली तरी तिला हे का ठाऊक नव्हतं? पण तरीही तिने कुठल्याही कारणाने का होईना..हे धाडस केलंच होतं! परिणामांची जबाबदारी सर्वस्वी तिचीच!  अमर रहे….च्या घोषणा अल्पावधीतच हवेत विरून जातात, राजकीय,सामाजिक नेत्यांच्या भाषणांतील,मदतीच्या आश्वासनांतील काही शब्द,आकडेही बहुतांशवेळा पुसट होत जातात

आपल्या देशात सैन्यसेवेत असलेले सुमारे १६०० जण विविध कारणांनी मरण पावतात दरवर्षी. यात अतिरेक्यांशी लढताना,सीमेच्या पलीकडून होणा-या गोळीबारात धारातीर्थी पडणा-यांचे संख्याही दुर्दैवाने बरीच असते….यातून वीरनारींची संख्याही वाढत राहते. प्रत्यक्ष सशस्त्र संघर्षात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या, हयात असलेल्या वीरनारींची संख्या मार्च २०२३ पर्यंत होती….चौदा हजार चारशे सदुसष्ट! आणि या आकड्यांत दुर्दैवानं या वर्षीही भरच पडलेली आहे! 

सैनिकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाची,विशेषत: पालक आणि पत्नी यांची होणारी हानी प्रचंड असते. हौतात्म्याची भरपाई करणं शक्य नसलं तरी ज्या समाजाचं हा सैनिक वर्ग जीवाची बाजी लावून रक्षण करत असतो, त्या समाजाचं प्रथम कर्तव्य हेच असावं की त्यानं या नुकसानीची मानवीय दृष्टीकोनातून भरपाई करण्याचा प्रयत्न करणे! 

कामी आलेल्या सैनिकाच्या परिवाराला गेल्या काही वर्षांपासून सुमारे एक कोटी रुपये दिले जातात. पण हा पैसा स्वत:सोबत अनेक समस्याही घेऊन त्या कुटुंबात प्रवेश करतो. हयात असणा-या माजी सैनिकांना निवृत्तीवेतन दिले जातेच. त्याच्या पश्चात त्याच्या आई-वडीलांना,पत्नीला आणि काही नियमांना अधीन राहून अपत्यानांही निवृत्तीवेतन दिले जाते. पाल्यांचे शिक्षण,नोक-या इत्यादी अनेक बाबतीतही शासकीय धोरणं कल्याणकारी आहेत.  

तरूण तडफदार असेलेले सैनिक सैनिकी कारवायांमध्ये ब-याचशा मोठ्या संख्येने अग्रभागी असतात. यात हौतात्म्य प्राप्त झालेले सैनिक जर विवाहीत असतील तर त्यांच्या पत्नीही वयाने तरूणच असतात, हे ओघाने आलेच. 

विधवेने पुनर्विवाह करणे या बाबीकडे समाजाकडून अक्षम्य दुर्लक्ष आणि अमानवीय विचारांमुळे विरोध झाल्याचे कालपरवापर्यंत दिसून येत होते. नुकसानभरपाईपोटी आलेला पैसा,कुटुंबाची संपत्ती कुटुंबातच रहावी, या अंतर्गत उद्देशाने स्त्रियांचे पुनर्विवाह लावून देताना वधूवरांच्या वयातील अंतरांचा किती विचार केला गेला असेल, हाही प्रश्नच होता. 

समाजाचा स्त्रियांना केवळ उपयुक्त साधन मानणे हाही विचार सर्वत्र होता आणि आहेच. हुतात्मा सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणा-या निवृत्तीवेतनात आणि इतर आर्थिक लाभांत पत्नीचाही तेव्हढाच वाटा असतो. तीच जर पुनर्विवाह करून गेली तर घरातील पैसा इतरत्र जातो किंवा जाईल, हे समाजाने हुशारीने ताडले आहे. त्यामुळे आदर्श पत्नी म्हणून तिने अविवाहीत रहावे, सासु-सास-यांची सेवा करीत उर्वरीत आयुष्य रेटावे, असा प्रयत्न होतो. त्यातून पुढे आलेली आणि माणुसकीचे फसवे कातडे पांघरून रूढ झालेली प्रथा म्हणजे चुडा प्रथा. सैनिकाच्या विधवेने किंवा कोणत्याही विधवेने त्या दीराशी लग्न करणे! हे प्रमाण राजस्थानात सर्वाधिक आहे. यात बाईच्या पसंती-नापसंतीला कितपत वाव असेल? पण यात संबंधित दीर अविवाहीत असला पाहिजे ही अट मात्र सुदैवाने आहे. पण हा गुंता किती मोठा आणि महिलांसाठी किती अडचणींचा असेल याचा विचार केला तरी अवघडल्यासारखे होते. 

पंजाब,हरियाना,हिमाचल प्रदेश, बिहार सारख्या राज्यांत हाच कित्ता थोड्या अधिक फरकाने गिरवला जातो. पंजाब-हरियाणात करेवा प्रथा आहे. यातही दिवंगत सैनिकाच्या/व्यक्तीच्या विधवा पत्नीचा अविवाहीत दीराशी लग्नाचा रिवाज आहे. आणि पहिल्या पतीच्या अंत्यसंस्कारानंतर केवळ दोन आठवड्यानंतरही असे विवाह लावले जातात. आणि यात कोणताही समारंभ केला जात नाही…

वर वर पाहता या प्रथा विधवांना आधार देणा-या वाटत असल्या तरी यांत विधवेविषयी सहानुभूती वाटणे किती आणि आर्थिक विचार किती हा प्रश्न आहेच. राजस्थानात या प्रश्नाने तर मोठे स्वरूप धारण केले आहे. कारण राजस्थानातील वीरनारींची संख्या मार्च २०२३ पर्यंत १३१७ एवढी होती. अशा प्रकारे आपल्या दीराशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याची मनापासून किती विधवांची इच्छा असावी? आपली भावनिकतेच्या जाळ्यात ओढून सोयीस्कर अर्थ लावणारी, पुरुषप्रधान सामाजिक मानसिकता लक्षात घेता याचं उत्तर काय असेल, हे सूज्ञ समजू शकतात. 

पंजाबात दोन हजारांपेक्षा अधिक तर हरियाना,उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात सुमारे अकराशेच्या वर वीरनारी आहेत. अपत्य नसलेल्या वीरनारीने पुनर्विवाह केला तरी तिचे निवृत्तीवेतन सुरु राहते. पण तिचे इतर मार्गांने होणारे उत्पन्न निवृत्तीवेतनाएवढे किंवा जास्त झाले की ही रक्कम देणे बंद केले जाते. अपत्य असेल आणि नात्याबाहेर पुनर्विवाह केला तरी वेगळे नियम लागू होतात. 

सैनिक विधवेशी तिला मिळत असलेल्या पैशांवर डोळा ठेवून विवाह करणा-यांची संख्याही असेलच. परंतू यात किमान त्या स्त्रीची स्वसंमती तरी असते. वीरनारींना त्यांच्या पतींनी गाजवलेल्या शौर्याचे पारितोषिक म्हणून काही विशेष रक्कमही दरमहा देण्याची पद्धत आहे. मात्र ही रक्कम त्या स्त्रीने फक्त तिच्या दीराशीच लग्न केले असल्यासच देय असे २००६ पूर्वी. २०१७ मध्ये या नियमात बदल करण्यात आला! 

सरकार,नेते,संघटना,व्यक्ती यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात येतातच असे दुर्दैवाने होत नाही, हेही वास्तव आहे. हुतात्मा वीर सैन्याधिका-यांच्या कुटुंबियांना कित्येक वेळा शासन पेट्रोल पंप, गॅस एजन्सी इत्यादी बहाल करीत असते. यासाठीही मोठा कागदोपत्री कारभार कुटुंबियांना करावा लागतो. सैनिक कोणत्या परिस्थितीत मृत्यू पावला याही गोष्टीला नुकसानभरपाईबाबत मोठे महत्त्व आहे. 

भारताच्या ग्रामीण,आदिवासी भागातील वीरनारींच्या कपाळी तर काहीवेळा भयावह संकटे आल्याची उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एन.एस.जी.कमांडो लान्स नायक राजकुमार महतो यांची पत्नी जया महतो! राजकुमार महतो कश्मिरात अतिरेक्यांविरुद्ध प्राणपणाने लढताना धारातीर्थी पडले. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती या नजीकच्या कालावधीत काही कारणांनी मृत्यू पावलेल्या होत्या. त्यात राजकुमारही गेल्यामुळे गावक-यांनी या घटनांसाठी थेट जया यांना जबाबदार धरले आणि चेटकीण म्हणून त्यांना ठार मारण्याची तयारीही केली होती. भारतीय सैन्य जया महतो यांच्या मदतीला वेळेवर पोहोचू शकले म्हणून त्या बचावल्या! पण आपला समाजाचा काही भाग अजूनही किती मागासलेला आहे, याचे हे भयानक उदाहरण मानले जावे!   

नव्या घरात सैनिकाची पत्नी म्हणून काहीच काळापूर्वी प्रवेश केलेल्या सामान्य मुलीला तिचा पतीच जर जगातून निघून गेला तर तिच्या वाट्याला येणारी परिस्थिती किमान महिलावर्ग तरी समजावून घेऊ शकेल. अर्थात, विधवा सून आणि तिचे सासू-सासरे यांच्यातील भावनिक आणि आर्थिक परिस्थितीला काही अन्य बाजूही असतीलच. पण तरीही सर्वाधिक नुकसान सोसावे लागलेल्या सर्वच तरूण वीरनारींची स्थिती फारशी बरी नसण्याचीच शक्यता अधिक आहे. समाजातील सर्व विचारवंतांच्या स्तरावर या समस्यांची यथायोग्य आणि वास्तवदर्शी माहिती पोहोचणे गरजेचे आहे! 

(या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात वर्णन केलेली घटना एका विडीओ मध्ये पाहण्यात आल्यानंतर मी यावर गांभिर्याने विचार करून ही अल्प माहिती घेतली आहे. छायाचित्रातील ही वीरनारी भगिनी आणि लेखात उल्लेखिलेल्या बाबी याचा संबंध असेलच असे नाही. केवळ प्रतिपाद्य विषयाला परिमाण लाभावे म्हणून हे छायाचित्र वापरले आहे. यात काही त्रुटी असतीलच. पण समस्या मात्र ख-या आहेत, यात शंका नाही. विशेषत: सुशिक्षित महिलांनी यावर विचार करून याबाबतीत काही करता आले तर जरुर करावे.!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

Please share your Post !

Shares