सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “गंधर्व स्मरण …” – लेखक : श्री नंदन वांद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“नाना”, बालगंधर्व ह्यांचं एक नाटक “संत कान्होपात्रा” – ह्या नाटकावर त्यांचा अतिशय लोभ होता. त्यातील कान्होपात्रा ह्या भूमिकेत ते अंतर्बाह्य रंगत असत. जेव्हा हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले, तेव्हा त्यातील शेवटचा – पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या देवालयातील प्रवेश, म्हणजे श्री विठ्ठलाची मूर्ति आणि त्यालगतचे गर्भगृह, हे पडद्यावर दाखवत असत.
बालगंधर्व ह्यांनी त्यांच्या नाटकातील मंडळींना पंढरपूर येथे पाठवले. तिथली छायाचित्रे आणवली अन् रंगभूमीवर तसेच्या तसे सर्व उभे केले. ह्यासाठी सावंतवाडी येथील ‘भावजी’ ह्या नावाचा कसबी कलाकार नानांनी गाठला. सुतारांच्या सोबत हे कलाकार काम करू लागले. भावजी ह्यांनी विठ्ठलमूर्तिकरता शिरसाचे लाकूड मुद्दाम निवडून आणले, अन् त्या मूर्तीचे काम प्रचंड जीव ओतून केलं. मंदिराचा सेट आणि मूर्ति, सर्व घडवण्यासाठी २ वर्षं काळ गेला. अतिशय देखणी मूर्ति घडवली, ज्याने लोक तासंतास तिच्याकडे बघत बसत. दुर्दैवाने ती व्यक्ती पुढं मानसिक संतुलन बिघडून बसली, पण नानांनी त्यांच्या कलागुणांना जाणून त्यांची अखेरपर्यंत काळजी घेतली. त्यांस अंतर दिले नाही. पुढं हा मंदिराचा देखावा अन् मूर्ति प्रथम मुंबईत ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मधे दाखवले गेले, जे पाहण्यास प्रचंड गर्दी लोटली.
त्यानंतर नाना कंपनीला घेऊन पंढरपूर येथे गेले. कान्होपात्रा प्रयोग लावला. मंदिराचा सेट अन् विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. प्रयोग रंगला. थिएटर प्रचंड गर्दीने भरून गेले होते. नाटक पाहताना सर्व थिएटर स्तब्ध होते, डोळे लावून तो थाट अन् अभिनय बघत होते. नाटकाच्या शेवटी पांडुरंगाच्या पायांवर डोके ठेवून कान्होपात्रा देह ठेवते, ह्या प्रसंगानंतर पडदा पडून प्रयोग संपला. रसिक त्या प्रयोगाने इतके प्रचंड भारावून गेले. त्यांना भान राहिले नाही. सर्व रसिकांनी स्टेजवर येऊन कल्लोळ केला. सर्वांचे म्हणणे, ‘आम्हाला कान्होपात्रा ह्यांचे दर्शन पाहिजे’!!
ही गर्दी स्टेज मॅनेजरला पांगवता आली नाही. काय करायचं त्यास समजेना. एवढा कसला गलबला झाला म्हणून बालगंधर्व मेकअप न उतरवता स्टेजवर आले, तेव्हा काय विचारावे? लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी टेकवून नमस्कार केला. गर्दी कमी होता होईना. सर्वांना दर्शन घ्यायचेच होते आणि नाना मात्र, “अरे देवा! हे काय करता? माझ्या काय पाया पडता?” म्हणत लोकांना विनंती करत होते, “असे नका करू, असे नका करू!!!” सर्व प्रेक्षकांचे दर्शन घेऊन झाले. “झाले आमचे काम”, असे म्हणत सर्व प्रेक्षक निघून गेले.
त्याच वेळी योगायोगाने एकादशी आली. नानांच्या मनात पांडुरंगाला महापूजा, अभिषेक करण्याची प्रचंड इच्छा जागी झाली. पंचामृत स्नानासाठी त्यांनी तयारी केली. कोऱ्या दुधाच्या घागरी आणल्या, त्यातील अनेक घागरींमधील दुधाचे विरजण लावून पंचामृतस्नानासाठी श्री पांडुरंगाची महापूजा सिद्धता झाली.श्री विठ्ठलाला भरजरी पोशाखही तयार करून घेतला. एकादशी दिवशी भल्या पहाटे नानांनी चंद्रभागेत स्नान केले, सोवळे नेसून आत गाभाऱ्यात जाऊन पंचामृत स्नान आणि पूजन केले. हा सोहळा गाजला. ही बातमी समजली म्हणून हे सर्व बघायला पंढरपूरच जणु तिथं लोटले होते. पूजा झाल्यावर अतिशय आपुलकीने प्रेमाने सर्वांना पंचामृत तीर्थ, प्रसाद वाटला… ही त्यांच्यामधील मुरलेल्या ‘कान्होपात्रा’ची खरी आणि ‘नाना’ ह्या व्यक्तीची खरी भक्ती!!!
बालगंधर्व हे निरपेक्ष स्नेहाचे, निःस्वार्थ प्रेमाचे लोभी होते. उत्कट प्रेमाचे तंतू जपून ठेवणारे अतिशय हळवे व्यक्तिमत्त्व!! जीवन हे सौंदर्य आस्वादासाठी अन् त्यातून प्राप्त होणारा दिव्य आनंद अनुभवण्यासाठीच आहे. नानांनी आयुष्यभर जणु हाच प्रसाद स्वतःच्या कलेतून, गायनातून भरभरून सर्वांना दिला. त्यास अनुभवून तर त्यांच्या काळास “गंधर्वयुग” म्हणून मानले जाते!!
ह्या गंधर्वयुगाची सुरूवात २६ जून १८८८ ला नानांच्या जन्माने झाली, त्यास काल १३६ वर्षे झाली!!
दोन दिवसांवर आषाढीवारीसाठी ज्ञानेश्वरमहाराज पालखी प्रस्थान आहे पंढरपूरकडे आणि कालच नानांचा जन्मदिवस झाला, म्हणून हा लेख ! हा एक योगायोगच!
© श्री नंदन वांद्रे
पुणे
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈