? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments