श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ सिंदबादची सफर… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
टीम सेव्हरीन
पावनखिंड बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय.शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली.पुर्वी तिचं नाव घोडखिंड होतं..पण बाजीप्रभूच्या बलिदानाने ती पावन झाली.. म्हणून मग पावनखिंड.
काही वर्षांपुर्वी काही शिवप्रेमींनी ठरवलं.शिवाजी महाराज या खिंडीतून ज्या प्रकारे गेले.. तस्साच प्रवास करुन गडावर पोहोचायचे.तश्शाच एका पावसाळी रात्री त्यांनी ती पावनखिंड पार केली.गो.नी.दांडेकर,बाबासाहेब पुरंदरे यांनी पण अनेकदा ती पार केली.इतिहास प्रेमी जे असतात.. किंवा इतिहासाचे अभ्यासक..ते अश्या प्रकारची साहसी करतच असतात.
कालीदासाचं मेघदुत हे एक दीर्घ काव्य.या काव्यातील मेघाचा प्रवास सुरु होतो तो मध्य भारतातुन.. साधारण नागपुरच्या परिस्थितीनं निघालेला मेघ उत्तर भारतात कसा जातो .त्याला भारताच्या या भागातील निसर्ग कसा दिसतो याचे वर्णन म्हणजे मेघदुत.
मध्यंतरी याच मार्गाने एकाने प्रवास केला.. हेलिकॉप्टर मधुन..आणि मेघदुतामधील वर्णन अनुभवलं.
सिंदाबादची सफर पण आपण वाचत आलोय.. मुळ अरबी भाषेतील या सुरस कथा.सिंदाबादच्या सात सफरी वाचुन एकाला वाटलं की आपण सुध्दा अश्या सफरी कराव्यात.सिंदाबादने ओलांडले तसे..त्याच मार्गाने.. तश्याच पध्दतीच्या जहाजातुन.
टीम सेव्हरीन त्यांचं नाव.हा एक आयरीश संशोधक होता.या संपूर्ण मोहिमेचा खर्च उचलला होता ओमानच्या सुलतानाने.ओमान मधील सोहर हे एक बंदर.सिंदबाद या गावचा होता अशी येथील गावकऱ्यांची समजुत.त्यामुळे या जहाजाचे नाव ठेवलं गेलं..सोहर.
टीम सेव्हरीन ओमान मधील शहरांमधून..बंदरांमधुन भटकला.सिंदबाद ज्या प्रकारच्या जहाजातुन निघाला होता,ते जहाज नेमकं कसं होतं यावर त्यानं संशोधन केलं.त्याला समजलं की हे जहाज बांधण्यासाठी आपल्याला लाकुड आणावं लागणार आहे ते.. भारतातील मलबार किनारपट्टी वरुन.
तो कालिकतला पोहोचला.फार पुर्वी कालीकत बंदरामधुन मसाल्याचा व्यापार चालत असे.येथे येणाऱ्या अरबी जहाजांमुळे येथे बरेच उद्योग बहरले होते.जहाज बांधणारे.. दोरखंड वळणारे..जहाजांसाठी लागणारे लाकूड विकणारे.
येथे आल्यावर सेव्हरीनला समजलं की सागवान लाकडांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी आणली आहे.मग ऐनाचं लाकूड वापरायचं ठरवलं.मंगलोरच्या आसपास जंगलं, टेकड्या धुंडाळल्या.शेवटी कोचीन जवळ हवं तसं लाकूड मिळालं.
जहाजाच्या तळाचा भाग हा सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी साधारण बावन्न फुट लांबीचा सरळसोट वासा हवा होता.बराच तपास केल्यानंतर तोही मिळाला.बाकी महत्त्वाची खरेदी होती काथ्याची.चारशे मैल इतक्या लांबीचा काथ्या मिळणं आवश्यक होतं.लक्षद्विप बेटावरच्या या विषयातला तज्ञ म्हणजे कुन्हीकोया.त्याच्या सल्ल्यानुसार ही पण खरेदी झाली.
फळ्या जोडण्यासाठी पाव टन डिंक.. चुन्याची पोती..जहाजाला बाहेरुन लावण्यासाठी माशांचं तेल..ते सहा पिंप..हत्यारे..हातोड्या..अशी ही भली मोठ्ठी यादी.
जहाज शिवण्याची कला असलेले मोजकेच माणसं होते.. तेही लक्षद्वीप बेटावर.मग तेथुन दहा माणसं ओमानला आणण्यात आली.
आणि मग एका शुभ दिवशी जहाज बांधणीला सुरुवात झाली.तो दिवस होता ४ फेब्रुवारी १९८०.काही दिवसांतच सोहर नावाचं ते भव्य जहाज उभं राहिलं.
मस्कतमधील बंदरात जहाज उभं राहीलं.. अगदी मध्ययुगीन काळात होतं तसं.मग त्यावर एक एक साहित्य जमा होऊ लागलं.जनरेटर..कंदील..लाईफ जॅकेटस्.. खाद्य वस्तु..हजारो अंडी.. कांदे बटाटे.. आणि ओमानी खजुर.
सोहरवर कमीत कमी वीस कर्मचारी होते.परंपरागत जहाज हाकण्याची कला असलेले खलाशी.. देखभाल करणारे..शिडं हाताळणारे.. त्याशिवाय रेडिओ ऑपरेटर.. कॅमेरामन.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ.
२३ नोव्हेंबर १९८० या दिवशी सोहर ची वाटचाल सुरु झाली.ज्या मार्गाने आठव्या शतकात सिंदबाद गेला होता..त्यांचं मार्गाने सोहर निघालं.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोहर लक्षद्वीप बेटावर आलं.इथुन पुढे कालीकत.. मग श्रीलंका.पंचावन्न दिवसांच्या प्रवासानंतर सोहर सुमात्रा बेटावर पोहोचलं.नंतर सिंगापूर आणि शेवटी चीनचा किनारा.
नकाशा पुढे ठेवून बघितलं तर कळतं की सेव्हरीनची ही सफर सुरू झाली मस्कत पासून.अरबी समुद्र.. हिंदी महासागरातुन सहा हजार मैलांचा प्रवास करत साडेसात महिन्यांनी ही सफर पुर्ण झाली.खलाशांचं जीवन तसं धोक्याचचं असतं.सोहर वरील निम्मे खलाशी कधी ना कधी संकटात सापडले होते.अनेक संकटांचा सामना करत टीम सेव्हरीनची ही सफर पार पडली.ती मुळच्या सिंदबादच्या सफरीइतकीच रोमांचक होती.
या प्रवासासाचा सुरस तपशील आपल्याला वाचायला मिळतील मिळतो तो टीम सेव्हरीन ने लिहीलेल्या आपल्या पुस्तकात..१९८२ सारी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे.. ‘दि सिंदबाद व्हॉयेज’
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈