कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ ब्रह्मर्षी अंगिरा ऋषी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
अग्नि वायु रविभ्यस्तु त्र्यं ब्रह्म सनातनम |
दुदोह यज्ञसिध्यर्थमृगयु: समलक्षणम् ||
अर्थ:- परम्यात्माने सृष्टीमध्ये मनुष्याला निर्माण करून चार ऋषींकडून चार वेद ब्रम्हाला प्राप्त करून दिले. त्या ब्रह्माने अग्नी, वायू, आदित्य आणि तू म्हणजेच अंगिरा ऋषींकडून चार वेदांचे ज्ञान प्राप्त केले. असे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. म्हणजेच अग्नी, आदित्य, वायू आणि अंगिरा ऋषींकडून ब्रह्मा ने वेदांचे ज्ञान प्राप्त केले.
ब्रह्मर्षी अंगिरा वैदिक ऋषी होते. त्यांना प्रजापती असेही म्हणतात. त्यांच्या वंशजांना अंगीरस असे म्हणतात. त्यांनी अनेक वैदिक स्तोत्रे आणि मंत्र यांची निर्मिती केली.
अथर्ववेदाला अथर्व अंगीरस असेही नाव आहे.त्यांचे अध्यात्मज्ञान दिव्य होते. त्यांच्याकडे योग बल, तपसाधना व मंत्र शक्ती खूप होती.
अग्नीचं एक नाव अंगार असे आहे. एकदा अग्नीदेव पाण्यात राहून तपसाधना करत होते. जेव्हा त्यांनी अंगिरा ऋषींना पाहिले, त्यांचे तपोबल पाहिले तेव्हा ते म्हणाले, हे महर्षी, तुम्हीच प्रथम अग्नी आहात. तुमच्या तेजासमोर मी फिका आहे. तेव्हा अंगिरा ऋषींनी अग्नीला देवतांना हविष्य पोहोचवण्याचं मानाचं काम दिलं. तेव्हापासून यज्ञामध्ये अग्नीला आहुती देऊन देवतांना हविष्य प्राप्ती देण्याची प्रथा सुरू झाली. अंगीरा ऋषींनी आपल्या छोट्या आयुष्यात खूप मोठे ज्ञान संपादन केले असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. ते लहान असतानाच मोठे मोठे लोक त्यांच्याकडे येऊन शिक्षण घेत असत. एकदा ते म्हणाले,
पुत्र का इति होवाच ज्ञानेन परिगृह्य तान् |
ते ऐकून तेथे बसलेल्या अनेक वृद्धांना राग आला. त्यांनी देवांकडे तक्रार केली. तेव्हा देव म्हणाले, अंगिरा योग्य बोलले ,कारण ….
न तेन वृद्धो भवती येनास्य पलीतं शिर: |
यो वै युवाप्यधीयानस्तं देव: स्थविरं विदु: ||
अर्थ:-डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले म्हणजे माणूस वृद्ध होत नाही. तरुण असूनही जो ज्ञानी असतो त्याला वृद्ध म्हणतात. तेव्हा सर्व वृद्धांनी अंगिरा ऋषींचे शिष्यत्व पत्करले.महर्षी भृगु ,अत्री यांच्यासारख्या अनेक ऋषींनी अंगिराजींकडून ज्ञान प्राप्त केले. राजस्थान येथील अजमेर येथे महर्षी अंगिरा आश्रम आहे.महर्षी शौनक यांना त्यांनी परा आणि अपरा या दोन विद्या शिकवल्या.
त्यांना स्वरूपा, सैराट, आणि पथ्या अशा तीन पत्नी होत्या. स्वरूपा मरीची ऋषींची कन्या. तिच्यापासून बृहस्पतीचा जन्म झाला. बृहस्पती देवांचे गुरु.त्यांना खूप मुले झाली. सैराट किंवा स्वराट् ही कर्दम ऋषींची कन्या.तिचे पुत्र महर्षी गौतम, प्रबंध, वामदेव उतथ्य आणि उशीर. पथ्या ही मनु ऋषींची कन्या.तिचे पुत्र विष्णू, संवर्त, विचित, अयास्य असीज. महर्षी संवर्त यांनी वेदातील ऋचा रचल्या. त्यांनी अंगीरास्मृती हा ग्रंथ रचला. अंगिरा ऋषींना अनेक मुले झाली. देवांचे शिल्पकार ऋषी विश्वकर्मा हे त्यांचे नातू.
त्यांच्याबद्दल म्हणतात ….
तुम हो मानस पुत्र ब्रह्मा के,
तुम सभी गुणोंमें समान ब्रम्हा के,
दक्ष सुता स्मृती है भार्या तुम्हारी,
अग्नि से भी अधिक तेज तुम्हारा,
विश्वकर्मा जननी
योगसिद्ध है सुता तुम्हारी,
ऋग्वेदमें वर्णन तुम्हारा जितना,
नही और किसी ऋषी का इतना,
ऋषी पंचमी पर मनाते जयंती तुम्हारी,
मंत्र तंत्र के ज्ञाता, नाम ऋषी अंगिरा तुम्हारा
….. अशा ब्रह्मर्षी अंगिरा यांना कोटी कोटी प्रणाम
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈