श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
तिच्या देहाची कितीतरी वर्षांपूर्वीच माती झालीये…पण तिचा आत्मा अजूनही अधांतरीच आहे, अडकून पडलाय काळकोठडीत..बंदिवासात ! ती एकटीच आहे इथे…या प्रशस्त राजप्रासादात. अगदी रया गेली आहे या वास्तूची. पडक्या भिंती…दिवाणखान्यातील रंग उडालेली तैलचित्रं आणि भंग झालेली शिल्पं. क्रूर श्वापदांचे अक्राळ विक्राळ मुखवटेही आता केविलवाणे भासताहेत. तिला या बंदिवासात ढकलणारा सुद्धा आता या जगात नाही, आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न करणाराही कुठं दिसत नाही. आत्म्याला देहाच्या मर्यादा नाहीत आता…पण तरी तिला त्या बेसुमार मरुभूमीच्या पल्याड जाण्याचा मार्ग गवसत नाहीये…ती आजही अशीच मध्यरात्र उलटून गेल्यावर आपल्या कोठडीतून तिच्या उस्तादाच्या कोठडीपर्यंत धावत आलेली आहे….उस्ताद तिचा संगीत शिक्षक…ती आणि तिची थोरली बहिण गाणं-नाचणं शिकायच्या या उस्तादाकडे. राजवाड्यातल्या हुकुमची कामुक नजर पडली होती तिच्या थोरल्या बहिणीवर. पण उस्तादाने डाव ओळखून या दोघींना,त्यांच्या बापाला सावध केलं…आणि तिथून दूर निघून जा असं बजावलं. पण त्या राजवाड्याच्या भिंतींना भले मोठे कान होते…राजाचे कानही तिखट होते. त्याने पळून जाऊ पाहणा-या बापलेकीला चाबकाने फोडून अर्धमेलं केलं…फेकून दिलं वाळवंटातल्या तापल्या मातीत तडफडून मरण्यासाठी. ही धाकटी..अजून वयात यायची होती आणि फार फार तर चार-पाच वर्षात बाई होणारच होती ! राजाने तिला कैदेतच ठेवलं आणि उस्तादाला सुद्धा.
मध्ये कित्येक वर्षे उडून गेलीत..एका ठिकाणची वाळू दूर उडून जाऊन तिने भलतीकडेच आपलं बस्तान बसवलं आहे. उस्तादही नाहीत…पण आज तिला ते दिसताहेत…त्यांच्या कोठडीत मंद दिवा मिणमिणतो आहे…त्यांनी राग ‘पूर्वी’ छेडला आहे….स्वर अगतिक आहेत…विदग्ध आहेत ! धर्मानं अल्लाहचा बंदा आहे उस्ताद…त्याच्या रसूल अल्लाहला विनवणी करतो आहे….कर दो कर दो… दूर पीर हमारी ! हे ईश्वरा…हे दु:ख,पीडा दूर कर आमच्या जीवनातली…!
इथं पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांचा आर्त स्वर वाळवंटाच्या खोल उरातून उगवतो आहे….त्यांनी केंव्हातरी दीनानाथांच्या मुखातून ऐकलेली एक बंदिश….राग पूर्वी मधली…यावरच पुरिया धनाश्री आधारलेला आहे असे अभ्यासक म्हणतात. दीनानाथांच्याच ‘बाळ’मुखातून ही बंदिश आता स्रवते आहे. स्वरांच्या लेखी ईश्वर-अल्लाह एकच…स्वर पाण्यासारखे प्रवाही आणि रंगहीन असतात ! संगीत-साधकाला स्वर प्यारे..शब्द केवळ स्वरांची पालखी वाहणारे दास !
क्षुधित पाषाण (Hungry Stone) या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कादंबरीवर आधारीत गुलजार यांनी लिहिलेली चित्रकथा म्हणजे हिंदी चित्रपट ‘लेकीन’! डिम्पल कपाडिया..विनोद खन्ना. वर्ष १९९०. लतादीदी निर्मात्या आणि हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक. ‘यारा सीली सीली (ओलसर) बिऱहा की रात का जलना’…सारखी अनेक मधुर गाणी दिली बाळासाहेबांनी..स्वर अर्थातच थोरल्या बहिणीचा..दीदीचा ! ‘लेकीन’ मधलं ‘सुरमयी शाम जिस तरहा आये..सांस लेते हैं जिस तरहा साये’…आणि मुलायम आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर…आठवताहेत का?
या आधी १९८० मध्ये यशवंत दत्त अभिनित ‘संसार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. गीतकार होते सुधीर मोघे नावाचे अमोघ शब्द रचना करणारे कवी. बाळासाहेबांनी त्यांच्या ‘दयाघना..का तुटले चिमणे घरटे…उरलो बंदी असा मी !’ या काव्याला सुंदर चालीत चालवताना ‘पूर्वी’चेच सूर दिलेत..! आणि चित्रीकरणात यशवंत दत्त यांनी गाणे जगून दाखवलं आहे.
….. हे दयाघना, माझं इवलंसं घरटं मोडून पडलंय आणि उरलो आहे फक्त मी..एकाकी! माणसाचा जन्मच जणू एक कारागृह. इथं मागील जन्मातील कर्मांची फळं रोख भोगायला जन्माला यायचं आणि या जन्मातही कर्मांच्या गाठोड्यात आणखी भर घालत बसायचं..’ पुनरपि जननं…पुनरपि मरणं..पुनरपि जननी जठरे शयनं !’ हा बंदिवास मला चुकणारच नाही…मी तुझा बंदिवान ! या कोठडीला दहा दिशांच्या मजबूत भिंती आहेत आणि कैद्यांच्या हातात मोहाच्या,मायेच्या अवजड बेड्या….स्वत:हून काढल्या तरच निघणा-या ! पण या बेड्या काढण्याची,फेकून देण्याची इच्छाच होत नाही इथल्या बंदिवानाला..सवयीचं झालेलं असतं…यालाच माया म्हणतात…’मा’…णसाला ‘या’…तना देणारी ! ही माया माझे प्राण व्याकूळ करते आहे…देवा ! जन्माच्या चुलांगणावर बालपणीचं दुधाचं भांडं ठेवलं आहे…आणि त्याकडे खेळण्याच्या नादात ध्यानच नाही गेलं..बालपण उतू गेलं…अग्निच्या मुखात गेलं ! उरलेल्या दुधात वासनांचा मिठाचा खडा पडला नकळत…नासायाला वेळ नाही लागला !… आता देह वार्धक्याच्या वळचणीला येऊन उभा राहिला आहे…श्वास बालपण आठवू देत नाहीत, आणि तारुण्याच्या माजघरात पाय ठेवू देत नाहीत…अंगणात ऊन आहे…याच अंगणात हा देह एके दिवशी आडवा निजलेला दिसणार आहे…शेवटच्या प्रवासाला जाण्यासाठी…दयाघना ! का तुटलं माझं घरटं? हा प्रश्न नाहीये…हा स्वत:शी केलेला वैराण संवाद आहे..बंदिवानाला उत्तर मागण्याचा अधिकार नसतो !
दयाघना, का तुटले चिमणे घरटे ?
उरलो बंदी असा मी !
अरे, जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना !
दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली वेडी
प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना !
बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले
वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना !
(आंतरजालावर हृदयनाथ आणि लता दीदी एका जाहीर कार्यक्रमात वर उल्लेख केलेली रसूल अल्लाह ही बंदिश सादर करतानाचा विडीओ आहे. दीदीनी एक स्वर लावलाय…उंच…आणि तो स्वर अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या चेह-यावरचं हास्य पाहण्यासारखं आहे…बाळासाहेबही आता तीच उंची गाठताहेत..श्रोते क्षणभर स्तब्ध आणि मग टाळ्यांचा गजर…अखंड ! जा जा रे जा पथिकवा….आणि त्यावरून दयाघनाची याद आली ! म्हणून हे लिहिलं…)
(तपशीलात चुका आणि दीर्घ लेखनाचा दोष आहेच…दिलगीर आहे!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈