इंद्रधनुष्य
☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)
आपण बघितले की रामायणाचा काळ आहे 14000 वर्षांपूर्वीचा. आणि खगोलशास्त्रीय उल्लेखांच्या आधारावर श्री.नीलेश ओक यांनी ते सिद्ध केले आहे. आताच्या काळातील भौगोलिक वैशिष्ट्ये, जमीन, नद्या, समुद्र जसे आहेत तसेच ते 14000 वर्षांपूर्वी नव्हते.
वाल्मिकी रामायणात आलेले भौगोलिक वर्णन आताच्या काळातील पुरातत्व शास्त्र, जीवाष्म शास्त्र, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोल, अनुवंशशास्त्र, खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय आणि भारता बाहेरील काही निवेदने, वृत्तांताच्या आधारे मिळालेले पुरावे यांच्याशी अतिशय सुंदर तऱ्हेने जुळतात.
सीतेच्या शोधा साठी जेव्हा वानरसेना निघाली तेव्हा सुग्रीव त्यांना कोणी कुठे कसे जायचे ते समजावून सांगतो आहे. सुग्रीवाने त्या वानरसेनेचे चार भाग पाडून त्यांना चार दिशांना जायच्या सूचना दिल्या आहेत.
दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या वानरसेनेच्या गटाला सुग्रीव सांगतोय की तुम्ही जेव्हा या भूभागाच्या (म्हणजे भारताच्या) आग्नेय दिशेला तुम्ही महेंद्र पर्वतावर याल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य हा तेजस्वी तारा दिसेल तो फक्त तिथूनच तुम्हाला दिसू शकेल आणि तो सुर्या इतका तेजस्वी दिसेल. आता यात वैशिष्ट्य हे आहे की अगस्त्य फक्त तिथूनच का दिसेल असे म्हटले आहे तर त्या काळात तो फक्त भारताच्या अगदी दक्षिण टोकावरूनच दिसू शकत होता इतरत्र कुठूनही नाही. आता अगस्त्य हा तारा अगदी नवी दिल्ली येथूनही दिसतो. यावरून सुद्धा तो काळ 14000 वर्षांपूर्वीचा होता हे समजते. परत कारण तेच, पृथ्वीची परांचन गती.
पावसाळा उलटून गेल्यावर सुग्रीवाने आता सगळ्या वानरसेनेला एकत्र केले आहे. राम लक्ष्मण आणि सुग्रीव एके ठिकाणी बसले आहेत. सुग्रीव पहिल्यांदा पूर्व दिशेला अँडीज पर्वता पर्यंत वाटेत काय काय दिसेल ते सांगतो आहे. दक्षिण दिशेला भारतापासून अंटार्क्टिका पर्यंत काय काय दिसेल ते सांगतो आहे. याचा अर्थ असा नाही की वानरसेना अँडीज पर्वता पर्यंत किंवा अंटार्क्टिका पर्यंत जाऊ शकणार होती किंवा गेली होती. सुग्रीव फक्त सांगतोय. उलट सुग्रीव या ठिकाणी स्वच्छ सांगतो आहे की अंटार्क्टिका पर्यंत जाऊ नका. पश्चिमेला भारतापासून आल्प्स पर्यंत तो काय काय दिसेल ते सांगतो आहे.
आपण आधी पूर्व दिशे पासून सुरुवात करू. सुग्रीवाने चार दिशांना जाणारे चार गट केले. प्रत्येक गटाचा एक नेता ठरवला. पूर्व दिशेला जाणाऱ्या गटाचा नेता होता विनता. त्यासाठी आपल्याला आधी थोडी अनुवंशिकता आणि पुरातत्व शास्त्र यांच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. नव्या जेनेटिक संशोधनातून हे समजते की दक्षिण भारतापासून ते ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरीके पर्यंत एक जेनेटिक सिग्नल नजरेस पडतो. South East Asia, पापुआ न्यूगिनी, अंदमान निकोबार इ देशांचा यात समावेश आहे. यातून तो जेनेटिक ट्रेल जातो असे संशोधन आहे. पुरातत्वीय पुरावे हे सांगतात की माणसाचे अस्तिव दक्षिण अमेरिकेतील चिले येथे 33,000 BCE पासून आहे तर पनामा येथे 50,000 BCE पासून आहे. त्यामुळे सुग्रीवाने 12209 BCE च्या काळातील भौगोलिक वर्णन केले तर त्यात नवल वाटायला नको.
आता सागरीशास्त्राच्या दृष्टिकोनातून 14,000 BCE च्या वेळी पृथ्वीचा नकाशा कसा असू शकेल ते बघू. त्या वेळी आशिया खंड उत्तर अमेरिकेशी सरळ सरळ जमिनीने जोडलेला होता. तसेच भारतही इंडोनेशिया, लाओस, थायलंड अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत भागांशी सरळ जमिनीने म्हणजे land mass ने जोडलेला होता. आणि हे का तर त्यावेळी समुद्रसपाटी आताच्या काळा पेक्षा 120 ते 140 मीटर्स खाली होती म्हणून बरीचशी जमीन उघडी पडली होती.
आता सुग्रीव सांगतोय की तुम्ही त्या दिशेला जाल तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेची माणसे दिसतील. ज्यांच्या कानाची पाळी खांद्यापर्यंत लोम्बलेली असेल, त्यांचे ओठ लांबत जाऊन छाती पर्यंत ओघळले असतील. काही लोक कच्चे अन्न, कच्चे मासे खाताना दिसतील. ( इथे सुशी ची आठवण आल्या खेरीज रहात नाही). आता सुद्धा लाओस मध्ये पौडांग स्त्री, इंडोनेशिया मधील कानाची पाळी खांद्या पर्यंत ओघळलेली अशी स्त्री, खूप लांब जीभ असल्याचे डेकोरेशन केलेला द. अमेरिकेतला माणूस किंवा लांब कृत्रिम हनुवटी असलेली माणसे आजही दिसतात. South East Asia ते पापुआ न्यु गिनी येथे अशी चित्र विचित्र केश वेष भूषा केलेली वेगवेगळ्या टोळ्यांची माणसे आजही बघायला मिळतात. आफ्रिकेतही तऱ्हेतऱ्हेची माणसे ज्यांचे ओठ, कान अनैसर्गिक पणे ओघळलेले दिसतात. लांब कशाला अगदी आपल्या देशात दक्षिणेतील सुपर माची नावाच्या एका तेलगू सिनेमातील वयस्कर नटीच्या कानाची भोके अशीच खांद्यापर्यंत ओघळलेली आजही बघायला मिळतात. अगदी तस्सेच चित्रविचित्र माणसांचे वर्णन रामायणात सुग्रीवाच्या तोंडून वदवले आहे.
आता सुग्रीव ७ वेगवेगळ्या द्विपांची वर्णने करतो आहे. सुवर्ण द्वीप, रजत द्वीप, यवद्वीप म्हणजे ओट्स इ. त्या त्या बेटावर सोन्या चांदीच्या खाणी होत्या. यवद्वीपावर मोठ्या प्रमाणात यवाची शेती होत होती. त्या काळात भारत खूप तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बाहेरच्या देशांना देऊन तिकडून सोने, चांदी आयात करत होता. आणि ज्या ज्या बेटावरून सोने चांदी येत होती त्या त्या बेटांच्या नावाने ते सुवर्ण किंवा चांदी ओळखली जाते होती. जसे की जामबुनद सुवर्ण, सुवर्णद्वीप सुवर्ण, पारुजम, परू येथे मिळणारे सुवर्ण इ.
या सात बेटांच्या मधील वेगवेगळ्या (प्रॉव्हिन्सस) प्रांतांच्या चिन्हाच्या (एमब्लेम) मध्ये अशी नावे येतात. उदाहरणार्थ इंडोनेशियाच्या एका प्रॉव्हिन्स च्या चिन्हावर ‘ जय राया’ असे लिहिले आहे. कलीमंथन उत्तरा, बाली द्वीप जया, जावा बेटांच्या चिन्हावर ‘शक्ती भक्ती प्रजा’ असे लिहिलेले आहे. पापा इंडोनेशियाच्या एका चिन्हावर ‘ कार्य स्वाध्याय’ असे लिहिलेले आहे. बिननेक तुंगल इक म्हणजे चक्क Unity in diversity असे इंडोनेशियाच्या गरुडाच्या चित्राखाली लिहिलेले आहे. त्यानंतर पुढे त्या वेळच्या ज्वालामुखीचे, तलावांचे वर्णन त्यात येते.
आता आपण प्रशांत महासागर (क्षीरसागर) ओलांडून जाऊया. पॉलीनेशियातील भाषांचा संस्कृतीशी कसा संबंध येऊ शकतो याचा अभ्यास Uschi Ringleb नावाची एक कॅनेडियन संशोधक करते आहे. पॉलीनेशियातील एक नृत्यप्रकार आहे उला डान्स म्हणजे ‘सीवा’ डान्स. त्यांच्या भाषेत सीवाचा अर्थ नाच. इथे सीवा म्हणजे नृत्य करणारा आपला नटराज आठवल्या खेरीज रहात नाहीच. पॉलीनेशियाच्या काही भागात s चा h होतो आणि त्यामुळे सीवा चा हिवा. त्यामुळे तो नृत्यप्रकार हिवा डान्स म्हणून पण प्रसिद्ध आहे.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈