? इंद्रधनुष्य ?

☆ टिटवीची ‘टिवटिव’ – लेखक : श्री अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री जुईली केळकर ☆

गावखडीचे कासवमित्र डिंगणकर आंम्हाला तिथल्या सागरी कासवे संवर्धन मोहिमेची माहिती सांगत होते. 

ॲालिव्ह रिडले ही सागरी कासवांमधील आकाराने लहान असलेली कासवाची जात. जगभरच्या समुद्रांमधे आढळणारी ही कासवे. लहान म्हटली तरी ती दोन फुटा पर्यंत लांबी आणि पस्तीस ते चाळीस किलो वजनांची असतात. त्याच्या ॲालिव्ह करड्या रंगामुळे त्यांना हे नाव पडलेले. 

नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम. या काळात ती समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्याकरता येतात. अनेकांनी एकत्रीतपणे किनाऱ्यावर येऊन अंडी घालणे ही त्यांची विशेषता. विणीच्या काळात अंधाऱ्या रात्री भरतीच्या वेळी ती समुद्रातून किनाऱ्यावर अवतरतात. योग्य तापमानाच्या वाळूत खड्डा खणून घरटी बनवतात. त्यात अंडी घालून खड्डा पुन्हा वाळूने भरतात. आणि समुद्रात परत निघून जातात. ती परत कधीही घरट्याकडे परतत नाहीत. 

एकावेळेस शे दीडशे अंडी एक कासवीण घालते. अश्या अनेक कासवीणी हंगामात अंडी घालतात. पंचेचाळीस ते साठ दिवसांनी अंड्यातून पिल्ले घरट्यातून बाहेर येतात आणि समुद्रात जातात. 

अर्थात जी काही अंडी वाचतात, पिल्ले जगतात ती. कारण ही अंडी घरट्यातून पळवली जातात. माणसे तर पळवतातच. त्याच जोडीने कुत्रे, कोल्हे, रानडुकरे, खेकडे हे ही पळवतात. वाळू उकरून घरट्यातली अंडी पळवली जातात. 

आता मात्र कासवांच्या अंड्यांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करण्यात येत आहे. त्यात चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचा व स्थानिकांचा मोठा सहभाग आहे. प्रकाश डिंगणकर हा त्यापैकीच एक. 

एक उत्सुकता म्हणून आम्ही त्यांना विचारले की, विणीचा हंगाम हा तीन चार महिन्यांचा, त्यात अंडी घालण्याची वेळ अंधारी रात्र, मग कासवे अंडी घालायला किनाऱ्यावर आली आहेत हे कसे समजते? त्यात पुन्हा तुंम्हाला विजेरीचाही वापर करता येत नाही कारण तुम्ही सांगितले तसे त्या प्रकाशामुळे कासवे अंडी न घालता समुद्रात परत निघून जातात’. 

प्रकाश म्हणाला, “तसा आम्हाला साधारण अंदाज येतो. तिथीवरून काळोख्या रात्री कधी आहेत ते कळते.

आणि आम्हाला मदत होते ती टिटव्यांची. किनाऱ्याच्या परिसरात टिटव्या आहेत. कुठलाही परदेशी प्राणी तिच्या नजरेस पडला की टिटवी जोरजोरात ओरडायला लागते. आणि ती न थांबता ओरडत राहाते. तिचे ओरडणे ऐकू आले की आम्ही किनाऱ्यावर पोहोचतो. अजून एक गंमत म्हणजे टिटवीचे ओरडणे ऐकले की कोल्हेही येतात इथे. त्यांना पण कासवे आल्याची चाहूल लागते. कोल्हे कासवांच्या मागावर असतात. त्यांच्या मागे मागे जात घरटी उरकतात आणि आत पुरलेली अंडी खातात. ”

…………………..

वाघ बिबट्यांच्या हालचाली वानर, हरणे, मोर यांच्या ओरडण्याने, ‘कॅाल’ म्हणतात ते, कळतात, हे माहिती होते. कॅाल ऐकू येताच जंगल सफारीतले मार्गदर्शक व पर्यटक तिकडे जमा होतात, वाघ पहायला. परंतू टिटवीपण कासवांच्या किनाऱ्यावर झालेल्या आगमनाचा कॅाल देते हे माहिती नव्हते. मस्त वाटले ते ऐकून.

म्हणजे टिटवीची टिवटिवही अगदीच निरर्थक नसते तर!

 

लेखिका : श्री अनंत गद्रे

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments