श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ परशुराम –बुरोंडी दापोली ☆ श्री सुहास सोहोनी ☆
स्व हिमतीवर भगवान परशुरामांचा पुतळा उभारुन आपल्या आराध्यदेवतेप्रती भक्तीचा महापूर वाहणाऱ्या ‘परशुराम भूमी’ प्रांगणाची निर्मिती करणाऱ्या आणि भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला कितीही धन्यवाद दिले, तरी अपूर्ण राहतील…
दापोलीतून कोळथरेला निघताना बुरोंडी दापोली लागते. तिथे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा आहे. फारसा गाजावाजा न करता ही निर्मिती सुरु आहे.. आजूबाजूला पहाताना भव्य मूर्ती दिसते, ती पण भगवान परशुरामांची…. तिथे माणूस प्रचंड आनंदाने उतरतोच …..
ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार — भगवान परशुराम ! आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करुन तब्बल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केलेले थोर पराक्रमी व समाजाला सुखाचा मार्ग दाखविणारे——- चिरंजीव भगवान परशुराम ! तपःसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे—– भगवान परशुराम !
अशा भगवान परशुरामांचे मूर्त रुपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावे, या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक – सौ.अश्विनी आणि अनिल गोविंद गानू यांनी परशुरामभूमीची निर्मिती केली आहे…..
४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी असून फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे. भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून ‘तामसतीर्थ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिना-याचे दर्शन येथून होते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते, म्हणून त्याला ‘तामसतीर्थ’ म्हणतात.
हे कमालीची स्वच्छता असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. गोलाकार पृथ्वीच्या आत शिरल्यावर ध्यानगुंफा आहे. तिथे बसलात की, काहीही बोला – प्रतिध्वनी उमटतात. परशुरामांच्या चरणी लीन होतात.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भव्य पुतळा, त्याची निगा आणि इतर खर्च प्रचंड असूनही, येथे कसलेही प्रवेशशुल्क नाही…..
केवळ ‘जय परशुराम’ करुन न थांबता, प्रत्यक्षात भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला लाखो धन्यवाद. सगळ्यांकडे खूप काही असते, पण द्यायला उंच मन लागते…. सभोवतालचा आल्हाददायी परिसर मन तजेल करतो. मनाला शांतता देणाऱ्या या परशुराम-भूमीच्या निर्मितीला आठ वर्षे झाली आहेत.
माहिती संग्राहक : — सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈