सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 चल गं सये वारुळाला, वारुळाला

 नागोबाला पुजायला पुजायला

 नागपंचमीच्या अनेक लोकगीतातील हे एक गीत शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, शेताच्या एका कडेला किंवा पडीक माळरानात आपल्याला वारूळ दिसते. या(आयत्या) वारुळात साप, नाग राहतात ते शेतकऱ्यांचे मित्र असतात म्हणून वारुळांची पूजा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केली जाते. तसेच वारुळात असणाऱ्या मुंग्यांना देखील लाह्या खायला देतात. याचे कारण पावसाळ्यात त्यांना वारुळाच्या बाहेर येऊन अन्न गोळा करणे शक्य नसते. यावरूनच शेतकऱ्यांच्या शेती जीवनातील वारुळाचे महत्त्व आपणास कळते. पूर्वीच्या माणसांना विज्ञान माहीत नव्हते मात्र अनुभवाचे ज्ञान दररोजच्या निरीक्षणातून पक्के होते. तो निसर्गातील वेगवेगळ्या चमत्काराबद्दल, किमयेबद्दल, सूक्ष्म बदलाबद्दल परिचित होता म्हणूनच निसर्गाबद्दल तो कृतज्ञ होता. पूर्वजांच्या सर्व चालीरितींचे अनुकरण आणि परंपरांचे पालन करत होता. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून निसर्ग जपत होता, त्याची पूजाही करत होता.

निसर्ग आपला नेहमीच मार्गदर्शक असतो, निसर्गातील प्रत्येक घटक मानवास एक उपदेश, संदेश देत असतो. मुंगी निसर्गातील एक छोटासा घटक पण तिचे जीवन आपल्यापुढे एक आदर्श आहे. त्यांचे घर, एकोपा, परस्पर साहचर्य, नियोजन, चिवटपणा, जिद्द सर्वच गोष्टी माणसाने शिकण्यासारख्या आहेत.

मुंग्यांच्या घराला वारूळ असे म्हणतात. इंग्रजीत anthill. मातीचे कण आणि तोंडातील चिकट द्रवाला एकत्र करून मुंग्या वारूळ बांधतात. वरून साधे सोपे वाटणारे वारूळ आतून मात्र खोल खोल गुंतागुंतीच्या कप्प्यांचे असते. म्हणूनच पूर्वीच्या दंतकथामध्ये वारुळांच्या खाली भुयार, राजमहाल असल्याचे काल्पनिक उल्लेख आहेत. वारुळांची रचना अशी गूढच असते. वारुळाची रचना टोकाकडे निमुळती असल्याने कितीही पाऊस पडला तर पाणी वरून वाहून जाते आणि वारूळ आतून कोरडी राहतात. इतकेच नव्हे तर कारखान्याचा धूर जसा धुराड्यामार्फत उंचावर सोडला जातो त्याचप्रमाणे वारुळातील उष्णता या ढिगाऱ्यामुळे हवेत सोडली जाते. वर्षभर मिळेल तितके धान्य, अन्नकण वेचून मुंग्या वारुळात नेऊन धान्य कोठारात साठवतात आणि नडीआडीला हे धान्य वापरतात. माणूस जसे घराची साफसफाई करून घर स्वच्छ ठेवतो तसेच मुंग्याही आपल्या कोठारांची साफसफाई करतात. कचरा, निरुपयोगी धान्याचे कण, मेलेल्या कीटकांचे अवशेष त्या वारुळाबाहेर आणून टाकतात. कणसात दाणे भरले की पाखरे कणसांवर तुटून पडतात. पाखरांच्या चोचीतून खाली पडलेले असे धान्य तसेच खळ्यात पडलेले धान्य, मळणी करताना इकडे तिकडे पडलेले धान्य- बाजरी, ज्वारी, गहू मुंग्या वारुळात नेतात. सुगीचा काळ हा मुंगीपासून जनावरे, माणसे सर्वांनाच आनंददायी असतो. वेगवेगळ्या मुंग्यांची वारुळे वेगवेगळी असतात. मुंग्यांच्या जिद्दीचा अनुभव मी बरेचदा बघितला. रस्त्याच्या कडेला एकदा मुंग्यांनी वारूळ खोदायला सुरुवात केली. थोडीफार जमीन भुसभुशीत होताच मोठा पाऊस आला आणि वारूळ मुजुन गेले. मला वाटलं मुंग्या आता दुसरीकडे वारूळ करतील पण दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यानंतर त्याच जागेला वारूळ खोदायला सुरुवात केली. बरेचदा एखाद्या प्राण्याने किंवा किटकाने त्यांच्यावर हल्ला केला की एकजुटीने त्या शत्रूस कडकडून चावतात अगदी सापाला सुद्धा!

वाळव्याची सुद्धा वारुळे असतात. असे म्हणतात की वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते. तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी, शेतीतील उत्पादनवाढीसाठी होतो म्हणून शेतकऱ्यांना वारुळे फायद्याची असतात. गांडूळे जशी जमीन भुसभुशीत करतात तसेच मुंग्यासुद्धा जमीन भुसभुशीत करायचे काम करतात. मुंग्या माती फिरवतात आणि वायू देतात ज्यामुळे पाणी आणि ऑक्सिजन वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात. मुंग्या बियांचा भाग असलेल्या पौष्टिक इलिओसोम्स खाण्यासाठी त्यांच्या बोगद्यात बिया घेतात. या बिया अनेकदा उगवतात आणि नवीन रोपे वाढतात, पसरतात यासाठीच वारुळांचे संवर्धन केले जाते. आतमध्ये वारूळ जितकी खोल तितकेच उंच वर आणलेले मातीचे निमुळते ढिगारे असतात. एक मीटर ते पाच-सहा मीटर पर्यंत त्यांची उंची असते. हिरवाईत लपलेले एखादे उंच वारूळ लांबून एखाद्या मंदिराप्रमाणे किंवा पर्वताच्या सुळक्यासारखे सुंदर दिसते. इयत्ता सातवीत आम्हाला बालभारतीमध्ये कवी श्रीकृष्ण पोवळे यांची ‘वारूळ’ नावाची अतिशय सुंदर कविता होती. त्यात कवीने वारुळाला हीच उपमा दिली आहे.

 वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ

 कृमी कीटकांनी बांधले देऊळ

 शेतकऱ्यांच्या जीवनात असलेले वारुळांचे महत्व आता शेतकरीच विसरू लागले आहेत. कधी साप, नाग पकडण्यासाठी तर कधी अंधश्रध्दापायी तर कधी शेतीचे क्षेत्र कमी होईल म्हणून वारूळ खोदून नष्ट केली जात आहेत. लहानपणी आम्हाला बाई वारुळाची पूजा करायला नेत असत. सोबत आणलेल्या लाह्या वारुळावर विस्कटायला लावत. त्यावेळी तो फक्त उपचार वाटत होता पण आज त्यामागील उपयुक्तता व सहसंबंध लक्षात येतो. जुनाट, कालबाह्य, निरुद्धेश्य रूढी म्हणून आपण चांगल्या गोष्टी, परंपरांचा त्याग करत आहोत, निसर्गाचा ऱ्हास करत आहोत पण निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी आहेत. निसर्गाचा ऱ्हास हाच मानवाच्या विनाशाचे कारण ठरत आहे पण माणूस कधी डोळे उघडणार?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments