पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
इंद्रधनुष्य
☆ ‘‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
भारतरत्न लतादीदींनंतर जर भारतीय संगीतात कोणाचं नाव अगदी सहज ओठांवर येत असेल, ते म्हणजे आशाताई भोसले यांचं! दोघीही ‘संगीतसूर्य’ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्यका! तो सोनेरी झळकता सूर दोघींमध्ये तेजाळला नाही तरच नवल! आशाताईंना गळा आणि बुद्धीचंही वरदान मिळालंय. त्यांनी अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची हजारो गाणी गाऊन विक्रमच केला आहे. संसारातील धावपळ, आणि मुलाबाळांचं करून, आशाताईंनी त्या कठीण काळात, इतकी गाणी कधी आणि कशी रेकॉर्ड केली असतील, याचं मला नेहमीच आश्चर्य आणि अप्रूप वाटतं!
त्याकाळी गाणी रेकॉर्ड करणं हे एक आव्हानच होतं. त्यांच्या समकालीन अनेक गायक गायिकांमध्ये वेगळं आणि उठून दिसण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले, रियाज केला, मेहनत केली. रेल्वेचा प्रवास करून, धुळीत – गर्मीत उभं राहून, प्रत्यक्ष सर्व वादकांबरोबर थेट लाइव्ह गाणं आणि तेही उत्कृष्टरित्या सलग एका टेकमध्ये साकार करणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मी गायला लागले, तेव्हा सुद्धा माझी ९० ते ९५ टक्के गाणी मी दिग्गज वादक समोर असताना, सलग एका टेकमध्ये Live रेकॉर्ड केली असल्याने, मी यातील आव्हान आणि याचं महत्त्व निश्चितपणे जाणते. ‘वेस्टर्न आऊटडोर’ हा आशिया खंडातील सर्वोत्तम रेकॉर्डिंग स्टुडिओज् पैकी एक समजला जातो. त्या स्टुडिओतील अत्यंत बुद्धिमान साऊंड इंजिनीअर श्री. अविनाश ओक यांनी लतादीदी, आशाताई, जगजित सिंह यांची अनेक गाणी इथे रेकॉर्ड केलीत. माझेही जवळपास सर्व आल्बम अविनाशजींनी इथेच रेकॉर्ड केले, हे मी माझं भाग्य समजते. त्यांच्या मते, ‘लाईव्हमधे काही मिनिटांसाठी वादकांसह गायकाच्या, म्हणजे सर्वांच्याच ऊर्जा एकवटलेल्या असतात. प्रत्येक जण आपलं काम जीव ओतून अचूक करतो. एक गूढ, दैवी शक्ती त्या गाण्यात प्राण फुंकते. म्हणून अशा गाण्यांचा आत्मा अमरच असतो. त्यामुळेच ही गाणी ‘कालातीत’ होतात.’
आजकाल, डिजिटल रेकॉर्डिंग ही व्यवस्था गायकांसाठी खूप सोपी आहे. परंतु भावपूर्णतेसाठी सर्व वादकांसोबत गाणं हीच पद्धत योग्य होती, असं मलाही वाटतं. आशाताईंची शेकडो गाणी मला आवडतात. पण त्यातलं पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेलं ‘धर्मकन्या’ चित्रपटातलं ‘नंदलाला रे’ हे गाणं म्हणजे ‘मुकुटमणी’ आहे!
‘नंदलाला.. ’ ही भैरवी. एकदा या गाण्याबद्दल बोलताना हृदयनाथजी मला म्हणाले की, उस्ताद सलामत – नजाकतजींच्या भैरवीनं त्यांना झपाटलं आणि ही स्वर्गीय रचना अवतरली. मला तर नेहमी वाटतं, कोणीही दुसऱ्याकडून कोणतीही रचना उचलताना त्यातून नेमकी काय दर्जेदार गोष्ट घेतो, हे त्या – त्या माणसाच्या बुद्धीच्या आकलनाच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यात हृदयनाथजींनी एक से एक अशा कमाल जागा बांधल्या आहेत की, ही स्वरांची अभूतपूर्व सौंदर्यस्थळं आपल्याला आनंदाने स्तिमित करतात. आणि आशाताईंनी ती अशा काही भन्नाट ऊर्जेनं एकेका दीर्घ श्वासात गायली आहेत की एखादा शास्त्रीय संगीतातला गायकही ते ‘आ’ वासून पाहत राहील.
तसंच १९८३-८४ नंतर धर्मकन्या’मधली ‘पैठणी बिलगून म्हणते मला.. ’ सारखी अद्वितीय गाणी मला हृदयनाथजींसोबत भारतभर झालेल्या ‘भावसरगम’ कार्यक्रमात, त्यांच्या शेजारी स्टेजवर बसून सादर करण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा ही सगळी गाणी किती अफाट सुंदर आणि आव्हानात्मक आहेत, याचा प्रत्यय घेत मी ते आव्हान स्वीकारून आनंदाने गात असे. त्याच वेळी आशाताईंची महती अधिक जाणवत असे. या गाण्यातली ‘शिरी’ या शब्दांवरची सट्कन येणारी गोलाकार मींड गाताना तर मला, दिवाळीच्या फटाक्यातलं आकाशात झेपावणारं रॉकेटच दिसतं, ज्याचं नोटेशन काढणं खरंच कठीण आहे. ती जागा अपूर्व आहे.
‘पूर्व दिशेला अरूण रथावर’ हे गाणं ऐकताना समोर ‘ध्वज सोन्याचा झळकत सुंदर’ चित्ररूपाने डोळ्यांपुढे साकार होतो. या शब्दावरील भूप रागातून नट रागातील मध्यमावर हरकत घेऊन विसावतो, त्या हरकतीच्या जागेचे टायमिंग म्हणजे कळसच! अशा अनेकविध भाषांमधील त्यांचा ‘आशा टच’ हा काही विरळाच!
आशाताईंचं संगीत क्षेत्रात उच्चतम नाव असलं तरी आमच्या भेटीत, त्या किती साधेपणानं बोलतात, वागतात याची आठवण झाली तरी मला गंमतच वाटते.
एकदा पार्ल्याच्या दीनानाथ सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमात लतादीदी सोडून सगळी मंगेशकर भावंडं स्टेजवर हजर होती.. “तुमच्याकडे मंगेशकर भगिनी सोडून आणखीन कोण कोण गायलंय?” हा प्रश्न निवेदकाने पंडित हृदयनाथजींना विचारला. त्यावर माझे गुरू हृदयनाथजींनी माझं तोंडभरून कौतुक केलं आणि म्हणाले, “माझ्याकडे पद्मजा ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केव्हातरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ आणि इतर गाणीही फार सुंदर गायली आहे!”
आशाताई, उषाताई, मीनाताई, अशा बहिणींसमोर या दिग्गज कलाकार भावाने माझं कौतुक केल्यावर, नंतर त्या माझ्याशी कशा वागतील, काय बोलतील, अशी मला धाकधूक होती. परंतु मध्यंतरात आशाताईंसारख्या महान गायिकेने मला जवळ बोलावून, माझ्या गाण्याचं, तसंच साडीचं, दागिन्यांचं, (अशा स्त्रीसुलभ गोष्टींचंही) कौतुक केलं, हे पाहून मला अचंबाच वाटला. मीही त्यांच्या साडीचं कौतुक केल्यावर, “ही साडी मी तुम्हाला देऊ का?” असंही त्यांनी मला विचारलं. अर्थात, मी फार संकोचले आणि मनोमन आनंदलेही!
एकदा दादर येथील नुकतंच नूतनीकरण झालेल्या, ‘महात्मा गांधी जलतरण तलावा’चं उद्घाटन होतं. त्यानिमित्ताने तिथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. योगायोगाने हाही दिवाळी पहाटचाच कार्यक्रम होता.
दुसर्या दिवशी इंदौरला ‘सानंद’तर्फे दिवाळी पहाट कार्यक्रम असल्याने मला या कार्यक्रमानंतर त्वरित निघून इंदौरचं विमान गाठणं आवश्यक होतं. परंतु आयोजक श्री. प्रसाद महाडकर मला म्हणाले, “पद्मजाताई, थोडं थांबाल का अजून? आशाताईंनी ‘मला पद्मजाला आज भेटायचंच आहे!’ असा निरोप पाठवला आहे. आशाताईंना भेटायची मलाही तीव्र इच्छा होतीच. परंतु विमान गाठायचं म्हणून वेळेअभावी निघावं लागेल, असा त्यांना फोनवर निरोप दिल्यावरही आशाताईंनी, ‘पद्मजाला थांबवूनच ठेवा’ असा परत निरोप दिला.
काही वेळ मनाची उत्सुकता, आणि घालमेल चालू असताना आशाताई सुहास्यवदने आल्या आणि त्यांनी माझ्या ओंजळीत सोनचाफ्याची काही घमघमीत फुलं आनंदाने दिली. माझ्या आयुष्यात अनेकदा असे अविश्वसनीय आणि आनंदाचे सोनेरी क्षण आले, त्यापैकी हा एक! त्या ओंजळभर सुगंधी फुलांचा घमघमाट मला आजवर आनंद देत आला आहे..
परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो !
© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈