श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆
शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता
केवळ रसिकालाही दिसते माझी कविता
दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही
आभासाच्या गावी वसते माझी कविता.
मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो
अन् अर्थांचा मी काथ्या कांडत असतो
जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते
ते कांचन मी बाजारी मांडत असतो.
– इलाही जमादार
अशी असावी कविता, फिरून
तशी नसावी कविता, म्हणून
सांगावया कोण तुम्ही, कवीला
आहात मोठे ?–पुसतो तुम्हाला.
– कवी केशवसुत.
असे कितीतरी नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांचा उल्लेख करता येईल.
‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings’ हे William Wordsworth यांचे सुप्रसिद्ध विधानही आपणा सर्वांना माहित आहे. या सर्वांचा उल्लेख आज करण्याचे कारण म्हणजे आज जागतिक कविता दिन साजरा होत आहे.
साहित्यातील काव्यप्रकाराचा सन्मान करण्याचा आजचा दिवस ! युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आणि 21/03/1999 पासून दरवर्षी 21 मार्च जागतिक कविता दिन म्हणून साजरा होऊ लागला. “कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते” असे युनेस्कोच्या महासचिवानी म्हटले आहे. भाषिक विविधतेला समर्थन आणि लुप्त झालेल्या भाषा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे. युनेस्कोने आपल्या जाहीरनाम्यात “to give fresh recognition and impetus to National, Regional and International poetry movements” असे म्हटले आहे.
आजचा दिवस म्हणजे जगातील सर्व कवी, कवयित्री आणि काव्यप्रेमी रसिक यांच्या सन्मानाचा दिवस! चला,आपण सर्वजण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काव्यरसाच हा मधुघट काठोकाठ भरून ठेवूया.
संकलन
श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈