सुश्री स्वप्ना अमृतकर
*माऊली*
(सुश्री स्वप्ना अमृतकर जी की National Single Parent Day – 21st March पर रचित विशेष रचना। इस रचना के लिए सुश्री स्वप्ना अमृतकर जी का विशेष आभार। )
सोबत असते कायम, आमची होऊनी सावली
हसतमुख भासते कायम, आमची मायेची माऊली ,
आपसूक पितृछाया हरपली, भावनांचे आभाळ दाटले
नियतीचा खेळ सारा, तीने आधारवड होणे पसंत केले ,
दु:खांच्या सरींचा पाऊस, लवला तीचा हळवा डोळा
दृढ निश्चयाचा प्रारंभ, नाही घेतला श्र्वास मोकळा ,
कधी मऊ तर कधी कठीण, प्रसंगापरी तीच्या स्वभावछटा
आईवडील दोन भूमिकांमध्ये, तरी ममतेचा शीगेलोट कोटा ,
जवाबदारींचा डोंगर कोसळला, नाही वाटत असे तिला
धैर्याने एकेक पाऊल पुढे टाकते, आनंदवनाची ओढ तीला,
निवांतक्षणी शब्दांची करी ओवी, आठवणींचे गीत कंठात
उपजत कलागुणांची खाण, सदा देते वाण हा आमच्या पदरांत,
आभाळमाया गीतेवरची, आयुष्याची सांज वीणा,
लाडके स्वप्न फुल, सारं काही अपूर्णच आई विना….
© स्वप्ना अमृतकर (पुणे)