श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
नवदुर्गांच्या औषधी रुपांचे वर्णन आजच्या चारोळ्यांमध्ये आहे.
या चारोळ्या अष्टाक्षरी छंदात गुंफलेल्या असून ” रुणुझुणुत्या पाखरा ” या सिनेगीताच्या चालीवर म्हणायला खूप छान वाटतं.
– साधक उर्मिला इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -3
दुर्गा देवीच्या नऊ रुपांपैकी आज रुप सात ते नऊ .
उर्वरित आई तुळजाभवानीची विविध रुप वर्णनाच्या चारोळ्या.
रुप दुर्गेचे सातवे
विजयदा कालरात्री
नागदवण औषधी
प्राप्त विजय सर्वत्री !!
मन मस्तिष्क विकार
औषध विष नाशिनी
कष्ट दूर करणारी
सुंदर सुख दायिनी !!
रुप दुर्गेचे आठवे
नाम तिचे महागौरी
असे औषधी तुळस
पूजिताती घरोघरी!!
रक्तशोधक तुळशी
काळी दवना पांढरी
कुढेरक षटपत्र
हृदरोग नाश करी !!
रुप दुर्गेचे नववे
बलबुद्धी विवर्धिनी
हिला शतावरी किंवा
म्हणती हो नारायणी
बलवर्धिनी हृदय
रक्त वात पित्त शोध
महौषधी वीर्यासाठी
औषधाचा गुणबोध !!
दुर्गादेवी नऊ रुपे
अंतरंग भक्तीमय
करु औषधी सेवन
होऊ सारे निरामय !!
येगं येगं अंबाबाई
आई तुळजाभवानी
तुझे वर्णन करण्या
आहे अपुरीच वाणी!!
देवी ललिता सुंदर
नाकी नथ मोतियाची
भास्कराने दिला रथ
दिव्य रत्ने सव्यसाची !!
माते तुझ्या मंदिराला
शोभे कळस सोन्याचा
तुझ्या डोईवरती गं
शोभे मुकुट सोन्याचा !!
तुझ्या मुकुटात हिरे
पायी सोन्याचे पैंजण
झळकते प्रभावळ
पैंजणांची रुणझुण !!
अष्टभुजा देवी माता
मूर्ती उंच दोन फूट
मूर्ती मागे प्रभावळ
डोईवरती मुकूट !
हाती ढाल तलवार
बाण धनुष्य कमळ
अशी आयुधे हातात
मूर्ती सुरेख तेजाळ !!
शेंडी महिषासुराची
डाव्याहाती पकडली
हाती उजव्या त्रिशूळ
देवी वेगाने धावली !!
!!श्रीजगदंबार्पणमस्तु!
क्रमश: …..
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
???