श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
??️ श्रीपांडुरंगाचा फराळ ?️?
खा..ऽ..रे विठ्ठला उपासाची खिचडी..
खा…रे विठ्ठला..खा..!!धृ.!!
करायला घेतली उपासाची खिचडी!
साबूदाणा शेंगदाण्याने केली फाकडी !
किसून घातली त्यात मी काकडी!
खा…ऽ.रे विठ्ठला उपासाची खिचडी!!१!!
घेतले शेंगदाणे खमंग भाजून !
गूळ वितळवला तूप घालून!
चिक्की बनवली पाटावर थापून!
खा..ऽ..रे विठ्ठला गोड गोड चिक्की !!२!!
वरईचा तांदूळ तुपात भाजला !
खुमासदार छान शिजवून घेतला!
चिंच गुळाचा कोळ केला!
दाण्याच्या आमटीला कोळ घातला!
झाली चवदार तांदूळ आमटी!
खा..ऽ.रे विठ्ठला.. वाटी वाटी !!३!!
खजूर सोलली बिया काढूनी!
बदाम बेदाणे पिस्ते घालुनी!
मिरची मीठ चवीस घालुनी!
त्याची केली चवदार चटणी!
खा..ऽ..रे विठ्ठला.. खजूराची चटणी!!४!!
पिकलेली ती लिंबे आणली!
फोडी करुनी उकडून घेतली!
तिखट मीठ साखर टाकली!
झाले तयार चवदार लोणचे!
खा..ऽ.रे..विठ्ठला उपासाचे लोणचे!!५!!
खा..ऽ ..रे विठ्ठला..खा..ऽ..
दिनांक:-१६-११-२०
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा