श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की नव वर्ष पर एक कविता “ नव वर्ष ”।)
☆ नववर्ष ☆
धुंद अशा वाऱ्याच्या झुंडीच्या झुंडी
निघाल्यात नववर्षाचं स्वागत करायला
हातात सुरई घेऊन…
वाऱ्याचा तोल सुटलाय सर्वत्र दर्प पसरलाय
रस्त्यात मद्याचा वास हुंगणारी काही यंत्र थांबलीत
शिकारी चित्त्यासारखी…
डांबराच्या नद्यांवरून वाहणाऱ्या गाड्या
आणि त्यात वळवळणारे काही मासे
लागताहेत गळाला…
रात्री बारानंतर फोनचा त्रास नको म्हणून मोबाईल बंद करून झोपलेय मी
पण पहाटे उठून पहातो तर काय
व्हाॕटस्अॕप व फेसबुकवर शुभेच्छांचा
मुसळधार पाऊस होऊन गेलेला…
थोड्याच वेळात सूर्यानं उत्साहत
माझ्या शहरात आगमन केलं
मी थोडं वेगळ्या नजरेनं त्याच्याकडे पहात होतो
तो मात्र नेहमी सारखा
नववर्षाचे कुठलेही भाव
त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दिसले नाहीत
तो मला जवळच्या मित्रासारखा वाटला
उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या पार्ट्यांचा
आमच्या दोघांवरही काहीच परिणाम झाला नव्हता…
मध्य रात्रीच्या गडद अंधारापेक्षा
सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात,
सूर्याच्या साक्षिणे
मी माझ्या परिवाराकडून,
आपल्या परिवारास,
२०२० ह्या नववर्षासाठी
मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो…!
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८