कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 127 – विजय साहित्य
☆ रूपरेषा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(गालगागा गालगागा, गालगागा,गालगा.)
जीवनाची रूपरेषा,घेतली उमजून मी
भावनांची वेषभूषा, पाहिली बदलून मी…! १
काळजाची भावबोली,बोलली परतायचे
यातनांची नाच गाणी, साहिली उकलून मी..! २
या दिलाची बाग तीही, सारखी भुलवायची
यौवनाची प्रेमवाणी, ऐकली उमलून मी..! ३
चाळली मी , प्रेम पाने, घेतले वाचायला
जिंदगानी आठवांची, काढली नखलून मी…! ४
तापलेल्या वाळवंटी, का मने हरखायची ?
पाजले पाणी कुणी ना , बावडी समजून मी..! ५
चाललो चालीत माझ्या, संगतीला आप्त रे
चाल माझ्या सोयऱ्यांची , नेणली परजून मी..! ६
लेखणीने आज माझ्या, अंतरी जपला वसा
अंतरीची भाव बोली , छेडली जुळवून मी..! ७
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈