कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 134 – विजय साहित्य
☆ पंढरी माहेर… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
मुराळी होऊन
घेतसे विसावा
माये तुझ्या नेत्री
विठ्ठल दिसावा. . . . !
पंढरीची वारी
ऊन्हात पोळते
गालावरी माये
आसू ओघळते.. . . !
विठ्ठलाची वीट
उंबरा घराचा
ओलांडून येई
पाहुणा दारचा.
पंढरीची वारी
भेटते विठूला
आठवांची सर
आलीया भेटीला. . . . !
विठू दर्शनाची
घरा दारा आस
परी सोडवेना
प्रपंचाची कास.
पंढरीची वारी
हरीनाम घेई
माय लेकराला
दोन घास देई. . . . !
पंढरीची वारी
रिंगण घालते
माय शेतामधी
माया कालवते.. . . !
पंढरीची वारी
माऊलींच्या दारा
माय पदराचा
लेकराला वारा. . . . !
म्हणोनीया देवा
पंढरी माहेर
आसवांचे मोती
करती आहेर.
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈