सुश्री मीनाक्षी सरदेसाई
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। कई पुरस्कारों/अलंकारों से पुरस्कृत/अलंकृत सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी का जीवन परिचय उनके ही शब्दों में – “नियतकालिके, मासिके यामध्ये कथा, ललित, कविता, बालसाहित्य प्रकाशित. आकाशवाणीमध्ये कथाकथन, नभोनाट्ये , बालनाट्ये सादर. मराठी प्रकाशित साहित्य – कथा संग्रह — ५, ललित — ७, कादंबरी – २. बालसाहित्य – कथा संग्रह – १६, नाटिका – २, कादंबरी – ३, कविता संग्रह – २, अनुवाद- हिंदी चार पुस्तकांचे मराठी अनुवाद. पुरस्कार/सन्मान – राज्यपुरस्कारासह एकूण अकरा पुरस्कार.)
अब आप सुश्री मीनाक्षी सरदेसाई जी के साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य को प्रत्येक बुधवार आत्मसात कर सकेंगे । आज प्रस्तुत है आपकी एक विनोदपूर्ण कविता पाणी.
☆ साप्ताहिक स्तम्भ – मीनाक्षी साहित्य – पाणी – ☆
शावरसर झरझरते घामट, चिकट अंगावर
लहरलहर झुळझुळते सुखाची साय मनावर।
चकचकीत टाईल्सच गंधभारलं बाथरूम।
शांपू, साबणाचा फेस मुलायम फुलारतो दरदरून.
फेसाळ, बक्कळ पाणी जाळीतून वाहून जातं
नळ्यांचा प्रवास करून फुक्कट गटारगंगा होतं.
अनेक फ्लॅट-बंगल्यातून राजभोगी असली स्नानं.
तिकडे टिचभर खोल्याझोपड्यात कोरडी, रिती रांजणं.
बादल्या,घागरी, गाडगीमडकी लांब रांगा रस्तोरस्ती.
तासन् तास माणसं उभी फक्त एका घागरीसाठी.
तिकडे खड्डा, इकडे धो धो अपराधी शावरसर.
सुरु करतं जलसंधारण एखादं शहाणं घर.
काटकसरीचा दुवा दुवा साखळी अश्शी गुंफली तर.
भर उन्हात बरसेल श्रावण, भरेल ‘त्यांची ‘ ठक्क घागर.
देवाचं देणं असतं पाणी, हवी सर्वांना समान वाटणी.
एकाने डुंबाव, दुसर्ऱ्याने वाळाव कशी गावी आनंदगाणी.
© मीनाक्षी सरदेसाई
मोबाईल नंबर 9561582372, 8806955070