कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 81 – विजय साहित्य ♥ काळजात रहा ♥ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
गेले काही दिवस
भेट नाही, दर्शन नाही..
कुठला मेसेज देखील नाही
आणि काल अचानक …..
भर पावसात तू आलास धावत
मुलीला सरकारी नोकरी लागल्याची
बातमी द्यायला… !
तुझ्याबरोबर मीही निथळत होतो….
आनंदाश्रूंनी नहात होतो.
तुझा जीवनप्रवास…
कुटुंब सावरताना झालेली ओढाताण
हाल अपेष्टा, अहोरात्र मेहनत
पोटाला चिमटा काढून केलेले…..
लेकीचे संगोपन, पालन पोषण..
आठवणींच्या आरश्यात
निथळत होतं… !
सा-या भावना…..
गच्च गळामिठीत बंदिस्त झाल्या.
आनंदयात्री मित्रा…
तुझ्या आठवणींचा आरसा
जगवतो आहे स्नेहमैत्री….
तूला मला आहे खात्री
अंतराची ओढ आहे
तुझ्या माझ्या काळजाला
म्हणूनच आलास धावत….
ही चातक भेट साधायला…. !
तू श्वास मैत्रीचा.
माझेच आहे निजरूप.
सुखात आणि दुःखात
घनिष्ठ मैत्री
हेच खरे जीवनस्वरूप… !
कारण….
काळजातली मैत्री
आणि आसवांची भाषा
सांगायची नाही.. पण.
अनुभवायची गोष्ट आहे.
काळातल्या मित्राची
हळवी ओली पोस्ट आहे.
माणसातल्या माणुसकीची
आठवणीतली गोष्ट आहे.
बाबा नाहीत..आई आहे
तिला रोज वेळ देत जा
लेक,पत्नी,आईला
जीवन सौख्य देत रहा.
आयुष्याच्या प्रवासात
असाच आनंद देत रहा.
कष्टमय वाटचाल तुझी
चिंता,क्लेश विसरत जा.
मित्रा, स्वत:ची काळजी घे.
वरचेवर भेटत रहा
घेतोय निरोप.
सावकाश जा…
काळजीत नको
काळजात रहा. !
© विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈