कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 85 – विजय साहित्य स्त्री एक शिल्पकार . . . . ! कविराज विजय यशवंत सातपुते ☆
माता महती थोर तरीही
दर्जा दुय्यम का नारीला ?
समानतेचा पोकळ डंका
झळा आगीच्या स्री जातीला. . . . !
नाना क्षेत्री दिसते नारी
कुटुंब जपते जपते नाती
तरी अजूनी फुटे बांगडी
पणती साठी जळती वाती. . . . . !
साहित्य,कला,नी उद्यम जगती
नारीशक्ती सलाम तुजला
तरी अजूनी आहे बुरखा
नारी जातीला म्हणती अबला. . . . !
शिल्पकार ही, आहे सबला
अग्नी परीक्षा नको तिची
स्वतः जगूनी आधार देते
दिव्यत्वाची घेत प्रचिती. . . !
आई, बाई, ताई, माई हाका केवळ
अजून वेशीवरती दिसते वेडी शालन
जातीपातीच्या अजून बेड्या पायी तुझीया
स्त्री मुक्तीचा स्वार्थी जागर की रामायण.
न्यायदेवता रूप नारीचे दृष्टिहीन का
भारतमाता प्रतिक शक्तीचे आभासी का
घरची लक्ष्मी अजून लंकेची पार्वती बनते
अजून पुरूषा बाई केवळ शोभा वाटे का?
रोज रकाने भरून वाहती होई अत्याचार
मुक्तीचा या स्वैर चालतो घरीदारी बाजार
जाग माणसा माणूस होऊन नारी शक्ती नरा
स्त्री मुक्तीचा गाजावाजा थांबव हा बाजार.
शिल्पकार ही अभंग लेणे मंदिर ह्रदयीचे
हिच्या अंतरी दडला ईश्वर साठे सौख्याचे
मनोमंदिरी करू प्रार्थना, ऐशा नारीचे
माया, ममता, आणि करूणा लेणे भाग्याचे.
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈