कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 94 – विजय साहित्य
☆ आली दिवाळी…… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
घरोघरी दरवळे
फराळाचा मिश्र वास
कडू गोड आठवांची
शोभे दिवाळी आरास. १
येता दिवाळी दारात
ज्योत स्नेहाची जागवू.
स्वार्थ सारा मनातला
वातीसम जीवे जाळू. २
मनी तोरण मानाचे
दान विचारांचे देऊ.
वासनेच्या असुराला
नरकाची वाट दावू. ३
मनातल्या आनंदाचे
रंग रांगोळीत घेऊ
आदराची मांदियाळी
स्वागताला ओठी ठेवू. ४
दीपज्योती स्नेहमैत्री
काय वर्णू त्याचे मोल
स्नेहमैत्री जागवूया
घ्यावा संदेश अमोल. ५
अशी दिवाळी आरास
तन मन प्रक्षाळते
पाडव्याला औक्षणात
नेत्रज्योत तेजाळते. ६
सण भाऊबीज खास
माया ममतेची बोली
ओवाळते भाऊराया
भगिनीची ह्रद्य झोळी. ७
आली दिवाळी दिवाळी
स्नेहज्योत तेजाळली
जाळू स्वभावाचे दोष
गळाभेट गंधाळली. ८
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈