श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
☆ सोन्याची जेजुरी ☆
मराठा साम्राज्याचे आराध्य दैवत!
प्राणाहून प्रिय जनमानसात !!१!!
खंडोबा राया म्हाळसा सुंदरी!
लाडके दैवत राणा मल्हारी!!२!
खंडेरायाची सोन्याची जेजुरी!
बसवली नवलाख दगडी पायरी!!३!!
तळीभंडारा अगदुम नगारा!
सोन्याची जेजुरी उधळा भंडारा!!४!!
खंडोबाचा येळकोट दुमदुमे नगरी!
करीते आरती बाणाई सुंदरी !!५!!
मराठा काळात सर्वात श्रीमंत!
प्रसिद्ध असे खंडोबा दैवत!!६!!
सन १८११ पेशवाई यादीतली!
मोडी लिपीत माहिती मिळाली!
सोने चांदी रत्ने जडावाची ती!
शंभराहून अधिक दागिने असती!!७!!
खंडेरायांचा शिरपेंचतुरा बिगबाळी!
मुंडावळ्या बाशिंग कंठी गळ्यातली!
अंगठ्या वाघनखं तोडे घागऱ्या !
खडावा त्रिशूळ ढाली तलवाऱ्या !!८!!
म्हाळसादेवींना चिंचपेट्या मंगळसूत्र कर्णफुले कानी!
बाजूबंद बोरमाळ ठुशी माणिक मोती सोन्याची वेणी!!९!!
शिवकालापासून हे दागिने असती!
मात्र पेशवे दप्तरात यांच्या चोरीच्या नोंदी दिसती !!१०!!
एकेकाळी खरीखुरी होती सोन्याची जेजुरी!
आजही भंडाऱ्याने लखलखते सोन्याची जेजुरी!!!!११!!
येळकोट येळकोट जय मल्हार!
येळकोट येळकोट जय मल्हार!!
मल्हारी मार्तंड जय मल्हार!
मल्हारी मार्तंड जय मल्हार!!!
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा
गुगल सौजन्याने:- श्री.राज मेमाणे मोडी लिपी अभ्यासक यांचे माहितीच्या आधारे खंडेराया व म्हाळसाईंच्या दागिन्यांची माहिती वर्णिली आहे.