श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ आषाढ सुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆
ऊधळावा अबीर गगनातला बुका
गजर ज्ञान-तुका पावसातली वारी.
आषाढाचे अभंग टाळ-चिपळी वारा
वृक्ष-वल्लरी दारा सृष्टीशृंगारे न्यारी.
भक्त-थोर सकळ पामराचे अंगण
वाखरिचे रिंगण स्वर्गापरी पंढरी.
हसू आनंदी मुखी चंद्रभागा ऊजळे
पाप कर्माचे ढळे पवित्र निरभावे.
ऐसा सुखाचा योग पाही विठ्ठले डोळा
सारे पाहुनी भोळा चैतन्याचा पुतळा.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈