सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ वनविहार… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(वृत्त – हरिभगिनी / स्वरगंगा)
मला आवडे स्वैरपणाने रानावनात हिंडावे
भीड सोडुनी खुशाल तेथे मुक्तपणाने बोलावे
कधी स्वतःशी बोलत बसणे गर्दी पेक्षा आवडते
विचारमंथन स्वतःचेच हे संवादाविण आवडते
ऐकत बसणे पक्षांचे स्वर आनंदाची खाण असे
संगितात या किती विविधता नादमधुरता खूप असे
झाडांशी त्या हितगुज करता पान फूल ही मोहरते
थरथर त्यांची हलकीशी पण स्पर्शामधुनी जाणवते
निसर्ग आहे भावसखा जो प्रत्येकाला जोजवितो
उदारतेने करीत पोषण जीव जीव तो वाढवितो
वसुंधरेला जपुनी आपण कृतज्ञतेने वागावे
मायलेकरे या नात्याला मनापासुनी वंदावे
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈