महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 92
☆ निसर्ग-राजा ☆
(काव्यप्रकार:- “अंत-ओळ” काव्य…)
श्रावण धारा मुक्त बरसता
“निसर्ग-राजा” गहिवरे
हर्ष त्याच्या मनांत दाटता
अंग -प्रत्यांग मोहरे …०१
अंग -प्रत्यांग मोहरे
गवतावर दिसती तुडतुडे
गाई वासरे मुक्त चरतांना
शब्द माझे होती तोकडे…०२
शब्द माझे होती तोकडे
नदी ओहोळ एकवटती
नदी ओहोळ एकवटतांना
स्वर्ग प्रगट, भूमीवरती …०३
स्वर्ग प्रगट, भूमीवरती
बळीराजा आनंदून जाई
शेतात घाम गाळतांना
त्याचा घामाला सुगंध येई…०४
त्याच्या घामाला सुगंध येई
शेत शिवार खुलून गेले
टपोर कणसे जोमात येता
छान कपाशी बोंड खुले…०५
छान कपाशी बोंड खुले
शुभ्र सोने बाहेर येई
सोने शुभ्र बाहेर येता
कास्तकार मोहून जाई…०६
कास्तकार मोहून जाई
“राज” ला मग विषय सापडे
ऐसा हरित विषय सापडता
कागदास जाणवती, ओरखडे…०७
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
खूप छान