महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 93
☆ स्वप्ने गोड असतात ☆
(विषय:- जगू पुन्हा बालपण… (अष्ट-अक्षरी))
जगू पुन्हा बालपण,
होऊ लहान लहान
मौज मस्ती करतांना,
करू अ,आ,इ मनन.!!
जगू पुन्हा बालपण,
आई सोबती असेल
माया तिची अनमोल,
सर कशात नसेल..!!
जगू पुन्हा बालपण,
मनास उधाण येईल
रात्री तारे मोजतांना,
भान हरपून जाईल..!!
जगू पुन्हा बालपण,
शाळा भरेल एकदा
छडी गुरुजी मारता,
रड येईल खूपदा..!!
जगू पुन्हा बालपण,
कैरी आंब्याची पाडूया
बोरे आंबट आंबट,
चिंचा लीलया तोडूया..!!
जगू पुन्हा बालपण,
नौका कागदाची बरी
सोडू पाण्यात सहज,
अंगी येई तरतरी..!!
जगू पुन्हा बालपण,
नसे कुणाचे बंधन
कधी अनवाणी पाय,
देव करेल रक्षण..!!
जगू पुन्हा बालपण,
माय पदर धरेल
ऊन लागणार नाही,
छत्र प्रेमाचे असेल..!!
जगू पुन्हा बालपण,
कवी राज उक्त झाला
नाही होणार हे सर्व,
भाव फक्त व्यक्त केला..!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈