डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ सारे मिळूनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
जात-पात लिंगभेद संपवूनी । समतेची छान गोधडी शिवू
चला आपण सारे मिळूनी, समतेचे नवे गाणे गाऊ !
नव्या उमेदीचे । नव्या तंत्रज्ञानाचे,
तुझ्या-माझ्या स्वप्नातील । सुराज्याचे गाणे गाऊ !
विरहाचे, दुःखाचे । आनंदमय क्षणांचे,
तुझ्या माझ्या कल्पनेतील । सुखाचे गाणे गाऊ…
श्रमणाऱ्या हातांचे । शिकणाऱ्या मुलांमुलींचे
तुझ्या माझ्या हातातील । नव्या कौशल्याचे गाणे गाऊ !
सीमेवर लढणाऱ्यांचे । मांडीवर जोजवणाऱ्यांचे,
तुझ्या माझ्या मनातील । संवेदनांचे गाणे गाऊ !
तिमिर दूर करणाऱ्यांचे । लख्ख प्रकाश किरणांचे,
तुझ्या माझ्या जाणिवेतील । विवेकाचे गाणे गाऊ..!
हृदयाच्या स्पंदनाचे । नीती मुल्यांच्या जोपासनांचे,
तुझ्या माझ्या काळजातील । जिव्हाळ्याचे गाणे गाऊ..!
बंधू-भावाचे, प्रेमाचे । न्यायाचे, वैश्वीक नात्याचे,
तुझ्या माझ्या अभिमानाचे । लोकशाहीचे गाणे गाऊ !
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈