श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : हरिभगिनी) (मात्रा : ८+८+८+६)
क्षितिजकरांनी शिंपित जीवन गगन धरेवर झुकले रे
किती दिसांनी आभाळाला फुटला पाझर ऐसा रे !…
लोट धुळीचे आले उडवित घोंघावत वादळवारे
बघता बघता होय नभांगण काजळकाळे सारे रे !
वीजशलाका अजस्त्र कडकड लखलख अंबर उजळत रे !
गगनघोष तो कृष्णघनांचा दुमदुमतो दाहि दिशांना
पुण्यात्म्याच्या कंठामधली दिव्यभव्यचि जणु प्रार्थना
जीवनगाणे जयनादाचे चराचरातुन झंकृत रे !
मुकुट धुक्याचे लेवुन सजली उन्नत पर्वतशिखरे ती
दरीदरीतुन तुषार उडवित निर्झर सारे झुळझुळती
रुजला अंकुर नवसृजनाचा उरी धरेच्या गंधित रे !
तुडुंब ओहळ तुडुंब शेते तुडुंब भरली तळी तळी
भरुन दूथडी नद्या वाहती दिशान्त बुडले सर्व जळी
येत दर्पणी जलाशयाच्या इंद्रधनू सतरंगी रे !
सुदुर हासती प्रसन्न हिरवी चिंब भिजूनी वने वने
प्राशुन अमृत धारांमधले हिरवी हिरवी रणे रणे
अभिषेकामधि मम प्राणांचे गोकुळ अवघे न्हाले रे !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈