श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ हवे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
भेटायला हवे
बोलायला हवे
दु:ख सुखापरी
झेलायला हवे
कोठेतरी.. कधी
थांबायला हवे
डोळे दुज्याप्रती
ओलायला हवे
वारा फिरे तसे
चालायला हवे
सांजावता ‘तिथे’
पोचायला हवे
‘नाही’ कधीतरी
सांगायला हवे
बोलावया; पुरे
ऐकायला हवे
भूतास संशयी
गाडायला हवे
आल्या भरू मना
सांडायला हवे
वागेल तो; तसे
वागायला हवे
आयुष्य पाहिजे?
सोसायला हवे
बाकी उरावया
भागायला हवे
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈