कवितेचा उत्सव
☆ राॅय किणीकर : काही रूबाया ☆ राॅय किणीकर ☆
☆
हा दोन घडीचा तंबूतील रे खेळ
या विदुषकाला नाही रडण्या वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ
☆
मी शब्द परंतू मूर्तिमंत तू मौन
मी पंख परंतू क्षितीजशून्य तू गगन
काजळरेघेवर लिहिले गेले काही
(अन)मौनाची फुटली अधरावरती लाही
☆
शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाऊनी झोपा मारीत बाता
रस रूप गंध अन स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले
☆
जळल्यावर उरते एक शेवटी राख
ती फेक विडी तोंडातील काडी टाक
जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी
दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी
☆
ही भूक शिकविते मागायाला भीक
अन भीती म्हणते गळा काढूनी भूंक
भूक आणि भीती देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणी अज्ञाताची
☆
का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फिरतो कोष मध्यबिंदूचा
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला.
☆
– राॅय किणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈