श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ एक अश्वत्थामा… ☆
मी नव्हतोच कधी अश्वत्थामा
तू मला त्याच्या ओळीत बसवून
भळभळणारी जखम दिलीस
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी
अश्वत्थामा अपराधी होता
अश्वत्थाम्याच्या हातून अधर्म घडला
द्रौपदीचे पाच निद्रीस्त पुत्र त्याने मारले
आणि याच पापाने त्याला घेरले
कृष्ण म्हणतो
ह्या कृत्यासाठी त्याला
मृत्युदंडच झाला पाहिजे
पण ब्राह्मण हत्या पाप आहे
आणि अपराध्याला मोकळं सोडणं
हे देखील पापच आहे
म्हणूनच अर्जुनानं
अश्वत्थाम्याला ठार केले नाही
तर त्याच्या कपाळावरचा मणी
आपल्या शस्त्राने काढून
त्या जागी
कायमची जखम दिली…
पण माझं काय ?
मी तर कुठलाच अपराध केला नाही
मग कशासाठी भोगतोय मी ही शिक्षा…
तू हुशार निघालीस
अर्जुनासारखा
कपाळावर वार केला नाहीस
तर तू केलास काळजावर
कुणालाच दिसणार नाही असा
अगदी मला देखील
पण जाणवते मला ती जखम
ऐन तारुण्यात वार करून
तू जन्माला घातलास
एक नवा अश्वत्थामा
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈