सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ मागणे… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
गूढगर्भ अव्यक्त असा
तू अनादी ओंकार
असुनीया निराकार
येसी तू आकारा
अन् व्यापशी या चराचरा
अथांग सागरी
सरीतेच्या जलांतरी,
पर्णफुलात गंध सुगंधी
लहरीत भासमान क्षितीजावरी
व्योमाच्या पोकळीत,
अनाकलनीय अस्तित्व
नि व्याप्त असा तू हुंकार
नादब्रम्हा,वर्णमय,स्वरांकित
अशा रे कलेच्या निर्मात्या
विद्येच्या उद्भवा
अस्तित्व जिथे जिथे तुझे,
वाहती चैतन्य झरे
कोटीसूर्यापरी तेजरुपा
नष्ट करूनी अज्ञाना
उजळसी अंतरंगी
ज्ञानज्योती झळझळती,
करुणामय दयाघना
प्रफुल्ल पुण्डरिकापरी प्रसन्ना,
व्यापली का मनी
माझ्या उदासीनता
तूची आता जाणून घे
विराटा विघ्नेशा तू
विश्वेशा तूची आधार
दे अन् उजळी मनी
चेतनामयी चितीपुंजा
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈