☆ कवितेचा उत्सव हरवलेली कविता श्री राजेंद्र परांजपे ☆
मधुघट पडले कोरडे अन् काव्य झाले सूने !
कवितेस माझिया माझेच घर भासतसे नवे !
ना शब्दांची आस ती ना अर्थाचा जिव्हाळा !
कुठे हरवली मम प्रतिभा, पडे प्रश्न मनाला !
बहु दिसात न झरले, उतरले काही मनीचे !
नकळे का असे हे जीवघेणे रुसणे शब्दांचे !
सांडले ते विषयही अवघे दूर अन् कोठेतरी !
सोडीली साथ माझी, का रुद्ध माझ्यावरी?
पाहतो वाट मी, पुन्हा कधी ती प्रसववेदना !
कधी पुन्हा माझ्यावरी होईल प्रसन्न शारदा !
अंतर्यामी हरवले जे, ते पुन्हा गवसेल का?
हृदयातली कविता हृदयातूनी प्रसवेल का?
© श्री राजेंद्र परांजपे
०७ सप्टेंबर २०२०
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈