श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ अनंताचा मंत्र… ☆ श्री आशिष मुळे ☆
दगडा वरती कोरत जावे
कागदा वरती छापत जावे
मना वरती उठवत जावे
लिहिणाऱ्याने लिहीत जावे।
बघणाऱ्याने निरखत जावे
जळणाऱ्याने निंदत जावे
हसणाऱ्याने चघळत जावे
लिहिणाऱ्याने लिहीत जावे।
भावणाऱ्याने रड़त जावे
जाणणाऱ्याने पारखत जावे
वाचणाऱ्याने शिकत जावे
शिकता शिकता लिहित जावे।
लिहिता लिहिता वाटत जावे
वाटता वाटता मरून जावे
मेल्यानंतर अमर व्हावे
लिहिणाऱ्याने लिहीत जावे।
कालचक्रात फिरता फिरता
स्मृतिरुपी पसरत रहावे
अंधकार जगी उगवता
ज्ञानप्रकाशे जगी अवतरावे।
लिहिणाऱ्याने लिहित जावे
वाचणाऱ्याने शिकत जावे
शिकता शिकता लिहित जावे॥
© आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈