श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ संध्याकाळी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
आयुष्याच्या गडद सावल्या लांबत गेल्या संध्याकाळी
आठवणींच्या तळ्यात सगळ्या मिसळत गेल्या संध्याकाळी
स्वप्नामधल्या ठोस प्रतिमा आदर्शाच्या मनात होत्या
काळासोबत फिरता फिरता वितळत गेल्या संध्याकाळी
सहजपणाने जगतानाही संघर्षाला भिडणे झाले
चालत असता अवघड वाटा चकवत गेल्या संध्याकाळी
अनंतकोटी ब्रम्हांडाची ओळख पुरती झाली नाही
जगण्यामधल्या मोहक बाबी फसवत गेल्या संध्याकाळी
अंधारातच अंदाजाने दिशा शोधल्या मानवतेच्या
मग प्रेमाच्या प्रकाश रेषा उजळत गेल्या संध्याकाळी
संसाराचा खेळ मांडला तो तर होता प्रभावशाली
प्रतिमा त्याच्या डोळ्यादेखत सरकत गेल्या संध्याकाळी
सुखदुःखाची करत बोळवण तडजोडीच्या घटना घडल्या
झंजावाती वादळात त्या उधळत गेल्या संध्याकाळी
खरे काय ते अखेर कळले अनुभवले ते मृगजळ होते
लोचनातल्या आसवधारा बरसत गेल्या संध्याकाळी
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अतिशय सुंदर कविता, मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद सर