☆ कवितेचा उत्सव : गझल – श्री चंद्रकांत कदम ☆
नव्हतीस सांग माझ्या तू आसपास केंव्हा?
सरला म्हणून नाही माझा सुवास केंव्हा!
हृदयात मीच तुझिया माहीत हे मला पण
दुनियेस सांगण्याचा घेशील त्रास केंव्हा?
प्रत्येक भेटणारा भुलतो तुलाच आहे
माझ्याच एकट्याची होशील खास केंव्हा?
गोडी तुझ्यातली तर आकर्षिते जगाला
ओठांवरी तुझ्या पण माझी मिठास केंव्हा?
जुळणार नाळ केंव्हा प्रत्येक काळजाशी?
माझीच भोवताली केवळ मिजास केंव्हा?
मी बोचतो जरीही तुजला खड्याप्रमाणे
चघळून टाक मजला समजून घास केंव्हा!
अंदाज पावसाचा सांगेल वेधशाळा
पण लागला कुणाला माझा कयास केंव्हा?
हमखास भेटशी तू गझलेतुनी म्हणूनच
इतक्यात होत नाही मीही उदास केंव्हा!
बघतो तिथे मला तू दिसतेस भोवताली
होतात का तुलाही माझेच भास केंव्हा?
आयुष्य मी कधीचे केले तुझ्याच नावे
घेशील सांग तूही माझाच ध्यास केंव्हा?
कुठवर परस्परांना निरखायचे दुरूनी?
होईल एक नक्की अपुला निवास केंव्हा?
तू बंद काळजाला केले कितीकवेळा
पण थांबलाच नाही माझा प्रयास केंव्हा!
काळा तुझीच खेळी असणार नेमकी ही
होतो सुपीक केंव्हा झालो भकास केंव्हा!
आजन्म श्रावणाची मी वाट पाहिली पण
केला कुणीच नाही माझा तपास केंव्हा!
गेलो बुडून दोघे प्रेमात एवढे की
कळले कुणास नाही सरला प्रवास केंव्हा!
© श्री चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड़
मो. – 9921788961
सुस्वागतम् आणि अभिनंदन
एक सुंदर गझल वाचायला मिळाली.